पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघासह सोलापूर जिल्हा ओला दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी – आ.समाधान आवताडे
मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर – मंगळवेढा विधान सभा मतदार संघासह सोलापूर जिल्हा ओला दुष्काळग्रस्त जाहीर करून येथील शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत देण्याची मागणी आमदार समाधान आवताडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे समक्ष भेटून निवेदनाद्वारे केली आहे.

आ.समाधान आवताडे यांनी दि.22 रोजी दिवसभर पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील अनेक अतिवृष्टी झालेल्या गावांना भेटी देत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत शेतकऱ्यांना सरकार निश्चित मदत करेल असा शब्द देऊन रात्री उशिरा मुंबईकडे प्रयाण करीत दि.23 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेत शेतकऱ्यांच्या व्यथा व समस्या मांडल्या. यावेळी त्यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघासह सर्व सोलापूर जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसां पासून सतत मुसळधार पाऊस कोसळत आहे.आतापर्यंत एकूण सरासरीच्या प्रमाणात १४५% इतका पाऊस पंढरपूर- मंगळवेढा विधान सभा मतदारसंघात पडला असून काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी संततधार पाऊस पडत असल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून ज्वारीचे कोठार समजले जाणा-या मंगळवेढा शिवारामध्ये २ फुट पाणी साचले असून ब-याच भागातील माती वाहून गेलेली आहे.अधिकाऱ्यांना पिकांचे पंचनामे करण्यासाठी शेतामध्ये जाणे मुश्कील झाल्यामुळे पंचनामे करण्यासाठी अधिका-यांना आणखी कांही दिवस मुदतवाढ देण्यात यावी.अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आलेले आहेत शेतकऱ्यांनी प्रसंगी कर्ज काढून खरीप हंगामातील पिके जोपासली आहेत.मतदार संघामध्ये मंगळवेढा तालुक्यातील ढवळस येथे अतिवृष्टीमुळे भिंत कोसळून योगीराज हेंबाडे या 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून त्याची बहीण जागृती हेंबाडे हिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जवळपास ३५ जनावरे मयत झाली असून १०० घरांची पडझड झालेली आहे.सामान्य शेतकरी,शेतमजुर, पशुपालक शेतकरी, निसर्गाच्या या रुद्र अवतारामुळे भयभित झाला आहे.पंढरपूर -मंगळवेढा मतदार संघासह सर्व सोलापूर जिल्ह्यामध्ये अशीच परिस्थिती आहे.काही ठिकाणी तर यापेक्षाही भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासह सर्व सोलापूर जिल्हा ओला दुष्काळग्रस्त जाहीर करुन सर्व शेतक-यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी.पुराच्या पाण्यामुळे प्रभावित झालेल्या कुटुंबांना आणि जिवीतहानी झालेल्या ठिकाणी तात्काळ आर्थिक मदत करण्याच्या सुचना देण्यात याव्यात तसेच येथील परिस्थिती पाहता पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघासह जिल्हा ओला दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा व त्या अनुषंगाने येथील नागरिकांना मदत देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक निर्णय लवकरच घेऊ असे सांगितले.तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना मंगळवेढा पंढरपूर मतदार संघातील स्थितीची माहिती देऊन मदतीची मागणी देखील आ.आवताडे यांनी केली आहे.ज्या ठिकाणी पर्जन्यमापक केंद्र आहेत त्या केंद्रावरती पडलेला पाऊस व्यवस्थितरित्या मोजला जात नाही त्यामुळे असे लक्षात आल्यानंतर स्कायमेट चे अधिकारी आणि जिल्हाधिकारी सोलापूर यांना सदरची पर्जन्यमापक यंत्र दुरुस्ती करून महसूल आणि कृषी यांची पर्जन्यमापक केंद्राचा आधार घेऊन मागील काही दिवसात पडलेला पावसाची आकडेवारी रिवाईज करून पंचनामा करणे संदर्भात सूचना दिल्या.