पुरग्रस्त शेतकऱ्यांना अधिक मदत मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडन महाराष्ट्राला विशेष पॅकेज मिळवून देणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
धाराशिव बीड जालना येथील पूरग्रस्त गावांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली पाहणी
धाराशिव /मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.25- आसमानी संकट कोसळून मराठवाड्यातील शेतीचे अतोनात नुकसान झालेले आहे.शेतपिकांचे नुकसान झाल्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.या शेतकऱ्यांचे अश्रु पुसण्यासाठी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे थेट शेताच्या बांधावर पोहोचले.

मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत. तसेच पूरग्रस्तांना शासनाने दिलेल्या मदतीत वाढ करण्याची गरज असून त्यासाठी आपण केंद्र सरकारकडून राज्याला भरीव मदतीचे विशेष पॅकेज मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.पूरग्रस्तांना कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्यांनी मदत करण्याची गरज असून कॉर्पोरेट कंपन्यांनी पूरग्रस्त जिल्ह्यांना दत्तक घ्यावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करताना सर्वप्रथम धाराशिव जिल्ह्यातील बोरखेडा गावातील पुरग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली.वाहुन गेलेल्या पिकांचे ; अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतपिकांची पाहणी केली.यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकांचे नुकसान झाले होते.सोयाबीन,मिरची आणि ऊस या पिकांचे धाराशिव भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसुन आले.
यावेळी धाराशिवच्या तहसिलदार मृणाल जाधव, रिपब्लिकन पक्षाचे युवक आघाडी महाराष्ट्र अध्यक्ष पप्पू कागदे, राजाभाऊ ओव्हाळ,लातुर चे नेते चंद्रकांत चिकटे;डॉ सुधाकर गुळवे,संजय बनसोडे,धाराशिव जिल्हाध्यक्ष विद्यानंद बनसोडे आदी उपस्थित होते.

यावेळी मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहिर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मराठवाड्यात महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकांची नुकसान भरपाई करण्यासाठी केंद्र सरकार द्वारे राज्याला विशेष पॅकेज मिळवून देणार असल्याचे आपण प्रयत्न करणार आहोत असे आश्वासन दिले.ज्यांनी शेतीसाठी कर्ज काढले आहे. त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज बँकांनी माफ केले पाहिजे. त्याबाबत आपण सर्व केंद्र आणि राज्य सरकारकडून बँकांना कळवणार आहेत आणि बँकांनी नुकसानग्रस्त शेतकर्यांचे कर्ज माफ केले पाहिजे अशी मागणी ना.रामदास आठवले यांनी केली.
आज ना.रामदास आठवले यांनी धाराशिव,बीड,जालना आणि औरंगाबाद या भागातील अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या भेटी घेतल्या आणि शेतीची पाहणी केली.