पंढरपूर तालुक्यात 21 गावांत कडक लॉकडाऊन
पंढरपूर तालुक्यातील 21 गावांत कडक लॉकडाऊन 10 पेक्षा जास्त रुग्ण संख्या असलेले गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित – प्रांताधिकारी गजानन गुरव Strict lockdown in 21 villages of Pandharpur taluka and villages with more than 10 patients declared as restricted area – Information of Prantadhikari Gajanan Gurav

पंढरपूर,दि.25 :- तालुक्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. यासाठी विशेष मोहीम राबवून कोरोना बाधितांचा शोध घेतला जाणार आहे. कोरोनाबाधितांची संख्या जास्त असणाऱ्या 21 गावांत 14 दिवस कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. तसेच ज्या गावांत 10 किंवा 10 पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण असतील ते संपूर्ण गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली.
तालुक्यातील ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनेबाबत सांस्कृतिक भवन, प्रांत कार्यालय, पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.बैठकीला तहसीलदार सुशिल बेल्हेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, तालुक्यातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक व तलाठी उपस्थित होते.
यावेळी श्री.गुरव म्हणाले, लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना बंद राहतील.विशेष तपासणी मोहिमेअंतर्गत तालुक्यातील सर्व दुकानदार ,व्यापारी,फळे व भाजीपाला विक्रेते, दूध विक्रेते यांच्यासह इतर व्यावसायिकांची आठवड्यातून कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.मोहिमेत चाचण्या वाढविण्यासाठी ‘नो टेस्ट नो रेशन’ ही संकल्पना राबविण्यात आली आहे.कोरोना संसर्गावर नियत्रंण मिळविण्या साठी नागरिकांनीही सामाजिक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, असे आवाहनही त्यांनी केले.
तालुक्यात कोरोना पॉझिटीव्हचा दर कमी
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्या आदेशान्वये पंढरपूरसह पाच तालुक्यात 13 ते 22 ऑगस्ट या कालावधीत संचारबंदी लागू करण्यात आली होती. या कालावधीत तालुक्यात कोरोना चाचण्याचे प्रमाण वाढविण्यात आल्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. दिनांक 1 ते 12 ऑगस्ट 2021 या कालावधीत पॉझिटिव्ह दर 5.86 टक्के होता,यामध्ये 1035 कोरोना बाधित रुग्ण,10 पेक्षा जास्त रुग्ण संख्या असलेली गावे 30,एकही रुग्ण नसलेली गावे 18 ,होम आयसोलेशनमध्ये 419 रुग्ण तर दिनांक 13 ते 24 ऑगस्ट 2021 या कालावधीत पॉझिटिव्ह दर 3.90 टक्के आहे.यामध्ये 805 कोरोनाबाधित रुग्ण,10 पेक्षा जास्त रुग्ण संख्या असलेली गावे 19,एकही रुग्ण नसलेली गांवे 22 ,होम आयसोलेशनमध्ये 169 रुग्ण असल्याचे श्री.गुरव यांनी सांगितले.
तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता कासेगाव , भंडीशेगाव, करकंब, गादेगाव, पटवर्धन कुरोली,भोसे,खेड भाळवणी,रोपळे,लक्ष्मी टाकळी,मेंढापूर,गुरसाळे,उपरी,चळे, खरातवाडी, लोणारवाडी,सुपली,गार्डी,खर्डी,सुस्ते,कोर्टी,आंबे या 21 गावांत कडक लॉकडाऊन जाहिर करण्यात आला आहे. नागरिकांनी याचे तंतोतत पालन करावे. तसेच पावसाळा सुरु असल्याने इतर साथीचे आजार उद्भवणार नाहीत, यासाठी आवश्यक उपाययोजना ग्रामपंचायतीने करावी, असे तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी सांगितले.
यावेळी आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या उपाययोजनेची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बोधले यांनी दिली.