जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी 18 कोटी 30 लाख रुपयांचे अनुदान मंजूर

कोल्हापूर,दि.8 (जिमाका) : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट व अतिवृष्टीमुळे शेती, जनावरे, घरे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.याबाबत झालेल्या नुकसानीचे सर्व पंचनामे करून शासनाकडे देय रकमेसाठी प्रस्ताव देण्यात आला होता. यासाठी शासनाकडे मागणी करण्यात आलेले सर्व अनुदान 18 कोटी 30 लाख 40 हजार रुपये जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले आहे अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.शासन जिल्ह्या तील सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या मदतीच्या अनुषंगाने शुक्रवार दि.10 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री प्रकाश आबिटकर आढावा घेणार आहेत.

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील एकूण 63 मंडळांमध्ये 382 गावांमध्ये 12,125.57 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. या आपत्तीमुळे 47,903 शेतकरी बाधित झाले असून या शेतकऱ्यांसाठी 18 कोटी 30 लाख 40 हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.यापैकी 12,184 शेतकऱ्यांना 6 कोटी 61 लाख 90 हजार रुपये वितरित झाले असून 806 शेतकऱ्यांच्या खात्यात 45 लाख 90 हजार रुपये जमा झाले आहेत. तथापि 11,306 शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रलंबित असून 6 कोटी 11 लाख 76 हजार रुपयांचे अनुदान देय आहे. प्रलंबित शेतकऱ्यांनी आपले ई-केवायसी तत्काळ करुन घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

अतिवृष्टीमुळे 27 गावे स्थलांतरित करावी लागली असून 719 कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. आपत्तीत 7 मृत्युमुखी पडलेल्यांना प्रत्येकी 4 लाख रुपयांप्रमाणे वारसांना मदत वितरित करण्यात आली आहे. स्थलांतरित 719 कुटुंबांपैकी 187 कुटुंबांना प्रत्येकी 10 हजार रुपये प्रमाणे 18.70 लाख रुपये वितरित करण्यात आले असून उर्वरित 532 कुटुंबांना अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. अतिवृष्टीमुळे सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीत जिल्ह्यातील शाळा,रस्ते,स्मशानभूमी, अंगणवाडी, ग्रामपंचायती व इतर विभागांचे नुकसान झाले आहे. त्या अनुषंगाने हे शासन स्तरावर मागणी करण्यात आली असून यासाठीही निधी उपलब्ध केला जाणार आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी संबंधित विभागांना तातडीने मदत वाटपाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सर्व शेतकऱ्यांचे ई-केवायसी त्वरित पूर्ण करून मंजूर अनुदान थेट त्यांच्या खात्यात जमा करण्यावर भर देण्याचे आदेशही दिले.

Leave a Reply

Back To Top