सोशल मीडियावरील जनजागृती अभियानामुळे केरळमधील 14 वर्षांचा एक विद्यार्थी मेंदू खाणारा म्हणजे ब्रेन इटिंग अमिबापासून वाचणारा जगातील नववा व्यक्ती बनला आहे.
केरळमधील कोझिकोड हॉस्पिटलमध्ये 22 दिवस राहिल्यानंतर अफनान जासिम घरी परतला. सुरुवातीच्या टप्प्यातच आजाराचं निदान झाल्यामुळेच तो वाचू शकला.
इतर आठ लोक देखील या जीवघेण्या आजारापासून वाचू शकले. यामागे देखील वेळीच आजाराचं निदान होणं हे मुख्य कारण आहे. या आजाराला प्रायमरी अमीबिक मेनिंगोएनसेफलायटिस (पीएएम) या नावानं ओळखलं जातं.
पीएएम हा आजार नीग्लेरिया फॉवलेरी अमिबामुळे होतो. या आजारात जवळपास 97 मृत्यूदर आहे यावरून त्यांचं गांभीर्य लक्षात येतं.
अमेरिकेतील सेंटर्स फॉर डिझीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननं या संदर्भात एक संशोधन केलं आहे. त्यांच्या संशोधनानुसार, 1971 ते 2023 दरम्यान या जीवघेण्या आजारातून ऑस्ट्रेलिया, अमेरिका, मेक्सिको आणि पाकिस्तानसारख्या चार देशांमध्ये फक्त आठ लोकांचाच जीव वाचू शकला. त्यातही लागण झाल्यानंतर 9 तासांपासून ते पाच दिवसांच्या आतच या आजाराचं निदान झाल्यामुळेच हे लोक वाचले.
डोकेदुखीनंतर अफनानला झटके येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे त्याचे कुटुंबीय घाबरले होते. उपचाराचे पहिले दोन दिवस अफनान झटके आल्यानंतरच्या स्थितीतच होता. डॉ. अब्दुल रऊफ कोझिकोडमधील बेबी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट पेडियाट्रिक इन्टेंसिविस्ट (गंभीर स्वरुपाच्या बालरोगांचे तज्ज्ञ) आहेत. त्यांनी बीबीसीला सांगितलं, “अफनान ला जेव्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं, तोपर्यत केरळमध्ये या आजारामुळे तीन जणांचा मृत्यू झाला होता. यातील दोन प्रकरणांमध्ये तर रुग्णांना खूपच उशिरा आमच्याकडे पाठवण्यात आलं होतं. यानंतर आम्ही सरकारला सूचना केली की हा एक सार्वजनिक आरोग्याशी निगडीत मुद्दा आहे. याबाबतीत जनजागृती अभियान सुरू केलं पाहिजे.”
अफनानवर योग्य वेळीच उपचार झाले, याचे श्रेय डॉ. रऊफ अफनानचे वडील एम के सिद्दिकी यांना देतात. ते म्हणतात, अफनानच्या वडीलांनी सांगितलं होतं की काही दिवसांआधी त्यांचा मुलगा कोझिकोड जिल्ह्यातील पायोल्ली महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या टिक्कोटी गावातील एका तलावात पोहण्यास गेला होता.
46 वर्षांचे सिद्दिकी यांचा पशुपालनाचा व्यवसाय आहे. त्यांनी बीबीसीला सांगितलं, “सोशल मीडियावर मी निपाह व्हायरसच्या लक्षणांबद्दल वाचत होतो, तेव्हाच मला अमिबा जीवाणूंबद्दल कळालं. त्यात मी संसर्गामुळे येणाऱ्या झटक्यांबद्दल वाचलं. अफनानला झटके येण्यास सुरूवात होताच मी त्याला स्थानिक हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. तिथेही जेव्हा त्याला झटके येणं थांबलं नाही. मग मी त्याला वडाक्कारामधील दुसऱ्या एका हॉस्पिटलमध्ये अफनानला नेलं. मात्र तिथे कोणताही न्यूरोलॉजिस्ट नव्हता. त्यांनीच अफनान ला बेबी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितलं.”
अफनानच्या वडिलांनी सांगितलं, “अफनानला झटके का येत आहेत, यामागचं कारण मला डॉक्टराकडून जाणून घ्यायचं होतं. कारण याआधी त्याला झटके आले नव्हते. त्यामुळेच मी डॉक्टरांना सांगितलं की तो पाच दिवसांपूर्वी तलावात पोहण्यास गेला होता. त्यानंतर त्याला डोकेदुखी सुरू झाली आणि नंतर ताप आला.”
अमिबा मेंदूपर्यंत कसा पोहोचतो?
एन. फॉवलेरी अमिबा मानवी शरीरात नाकाद्वारे पोहोचतो. तिथून तो मेंदूच्या खाली असलेल्या क्रिब्रिफॉर्म प्लेट मधून मेंदूपर्यत पोहोचतो.
डॉ. रऊफ सांगतात, “हा एक परजीवी असतो. त्यामधून वेगवेगळे रसायनं स्त्रवतात आणि त्यामुळे मेंदू नष्ट होतो.”
ताप येणं, तीव्र डोकेदुखी, घसा ताठरणं, गुंगीत राहणं किंवा बेशुद्ध होणं, झटके येणं आणि कोमासारखी अवस्था ही या आजाराची प्रमुख लक्षणं आहेत. या आजारात मेंदूवर अत्यंत दबाव पडतो आणि त्यामुळेच बहुतांश रुग्णांचा मृत्यू होतो.
डॉ. रऊफ म्हणाले, “हा अमिबा ताज्या पाण्याच्या तलावांमध्ये आढळतो. विशेषकरून गरम पाण्याच्या तलावांमध्ये आढळतो. आपण एका गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. ती म्हणजे लोकांनी पाण्यात उडी मारता कामा नये किंवा पाण्यात डुबकी मारू नये. कारण याच माध्यमातून अमिबा शरीरात प्रवेश करतो.”
“जर पाणी प्रदूषित असेल तर अमिबा नाकाद्वारे शरीरात प्रवेश करतो. प्रदूषित जलाशय किंवा तलाव, इतकंच काय स्वीमिंग पूल पासून देखील दूर राहणं सर्वात उत्तम. नाहीतर पोहणाऱ्यांनी किंवा जलतरणपटूंनी किमान आपलं तोंड पाण्याच्या वर ठेवावं. जेणेकरून अमिबा शरीरात प्रवेश करू शकणार नाही. पाण्यात क्लोरीन टाकणं खूपच आवश्यक आहे.”
कर्नाटकातील मंगळूरू येथील कस्तुरबा मेडिकल कॉलेजकडून एक शोधनिबंध (रिसर्च पेपर) प्रसिद्ध करण्यात आला आहे. या शोधनिबंधानुसार मात्र नवजात बाळांना एन फॉवलेरी अमिबाचं संसर्ग झाल्याच्या प्रकरणांचा संदर्भ देण्यात आला आहे. हे संसर्ग नायजेरिया आणि मंगळूरूमधील पाण्याच्या स्त्रोतांमधून झाले आहेत. या भागांमध्ये आंघोळीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यात देखील हा अमिबा आढळला होता. त्यातून या आजाराचा संसर्ग झाला होता.
अमेरिकेतील सेंटर फॉर डिझीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन मध्ये एप्रिल 2024 मध्ये पाकिस्तानातील संशोधकांच्या एका टीमचा शोधनिबंध (रिसर्च पेपर) प्रकाशित झाला होता. त्यानुसार या आजारातून ज्यांचा जीव वाचला आहे त्यांचं वय 9 ते 25 वर्षादरम्यान आहे.
काय आहेत उपचार ?
डॉ. रऊफ म्हणाले, “संपूर्ण जगात आतापर्यत पीएएमचे एकूण 400 रुग्ण आढळले आहेत. त्यातील 30 भारतातील आहेत. केरळमध्ये 2013 आणि 2020 मध्ये एक-एक रुग्ण आढळला होता. यावर्षी पाच रुग्णांची नोंद झाली आहे.”
अफनानच्या बाबतीत लक्षणं आढळल्यानंतर 24 तासांच्या आत डॉक्टरांनी लंबर ट्रीटमेंट आणि अँटी मायक्रोबियल औषधांचं कॉम्बिनेशन (एम्फोटेरिसिन बी, रिफाम्पिन आणि अॅजिथ्रोमायसिन) चा वापर केला.
ते सांगतात, “रुग्णाच्या सेरेब्रोस्पायनल फ्लूईड (सीएसएफ) मध्ये एन फॉवलेरी आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी आम्ही पीसीआर (पॉलीमरेज चेन रिअॅक्शन) केलं.”
ते पुढे सांगतात, “आम्ही रुग्णाला मिल्टेफोसिन दिलं. आधी हे औषध मिळणं कठीण होतं. मात्र अशा प्रकारचे रुग्ण आढळू लागल्यानंतर सरकारने जर्मनीतून ते आयात केलं आहे. या औषधाचा वापर भारतात दुर्मिळ आजारांवर उपचार करण्यासाठी केला जातो. मात्र असं असलं तरी हे औषध फार महागडं नाही.”
डॉ. रऊफ सांगतात, “झटके येत असल्यामुळे पहिल्या दिवशी रुग्ण फारसा शुद्धीत नव्हता. तीन दिवसांनंतर अफनानच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली. एक आठवड्यानंतर, आम्ही पुन्हा लंबर पंक्चरचा वापर केला आणि नमुन्यांची तपासणी केली असता त्यात अमिबा नसल्याचं आढळून आलं. त्यानंतर आम्ही त्याला एका रुममध्ये हलवलं आणि उपचार सुरू ठेवले.”
पुढील एक महिनाभर अफनान वरील औषधोपचार सुरू राहील. सध्या तो घरी विश्रांती घेतो आहे. आपला 10 वी चा अभ्यास सुरू राहील अशी त्याला आशा आहे.
अफनानच्या वडिलांनी बीबीसीला आपल्या मुलाचा एक रंजक किस्सा सांगितला.
सिद्दिकींनी हसत सांगितलं, “डॉक्टरांनी त्याला विचारलं की त्याला पुढे कसलं शिक्षण घ्यायचं आहे. त्यावर अफनाननं सांगितलं की त्याला नर्सिंगची पदवी घ्यायची आहे. हॉस्पिटलमध्ये नर्स ज्या प्रकारे काम करतात त्याचा अफनानवर प्रभाव पडला आहे. त्याने डॉक्टरांना सांगितलं की नर्स रुग्णांसाठी खूप परिश्रम करतात.”
Published By- Priya Dixit
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.