सोलापूर येथे जिल्हाधिकारी आणि अन्न आणि औषध विभागाला निवेदन
खव्यामधील भेसळ रोखण्याची सुराज्य अभियानची मागणी
सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज, दि.11.10.2025 : दसरा व दीपावली सणात मिठाई, पेढे, बर्फी, गुलाबजामून, कुंदा, बासुंदी यासारख्या गोड पदार्थांची मोठ्या प्रमाणावर मागणी असते. या पदार्थांचा मुख्य कच्चा माल म्हणजे खवा असून या काळात त्याची मागणी प्रचंड वाढते. वाढत्या मागणीचा गैरफायदा घेत अनेक ठिकाणी खव्यामध्ये भेसळ केली जाते.ही भेसळ आरोग्यासाठी घातक ठरत असल्याने तातडीने कार्यवाही करण्याची मागणी सुराज्य अभियानाच्या वतीने जिल्हाधिकारी आणि अन्न औषध विभाग यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी तर अन्न आणि औषध विभाग येथेही निवेदन स्वीकारले.याप्रसंगी उद्योजक किशोर पुकाळे,सागर बापट आणि सुराज्य अभियान चे दत्तात्रय पिसे उपस्थित होते.
या निवेदनातील प्रमुख मागण्या :
१. जिल्ह्यातील मिठाई विक्रेते व कारखान्यांवर अचानक तपासणी मोहीम राबवावी.खवा व गोड पदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवून अहवाल सार्वजनिक करावा.भेसळ आढळल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करावेत. २.नागरिकांना सजग करण्यासाठी प्रसार माध्यमे व पत्रकांद्वारे जनजागृती मोहीम राबवावी. ३.बाजारपेठेत नमुना चाचणी केंद्रे (Testing Booths) उभारावीत.