TETसंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर NCTE कडून हस्तक्षेपाची मागणी-प्रांताध्यक्ष मधुकर उन्हाळे
महासंघाच्यावतीने TET संदर्भात देशव्यापी निवेदन मोहीम राबवून पंतप्रधानांना निवेदन देऊन केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाची केली मागणी
सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि 8 नोंव्हे – अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाचे एक प्रतिनिधी शिष्टमंडळाने दि.७ नोंव्हे रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद (NCTE) चे अध्यक्ष प्रा.पंकज अरोरा यांची भेट घेतली.या प्रतिनिधी मंडळाने १ सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या निर्णयात (सिव्हिल अपील क्रमांक 1385/ 2025) NCTE कडून योग्य ती हस्तक्षेपात्मक कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

यापूर्वीच महासंघाच्यावतीने TET संदर्भात देशव्यापी निवेदन मोहीम राबवून 15 सप्टेंबर रोजी देशातील 500 जिल्ह्यातून पंतप्रधानांना निवेदन देऊन केंद्र सरकारने हस्तक्षेपाची मागणी केली होती.महासंघ संलग्नित शिक्षक परिषदेच्या वतीने महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यातून पंतप्रधानांना निवेदन दिले होते.TET संदर्भात महासंघाचा लढा यापुढेही असाच सुरू राहणार असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे प्रांताध्यक्ष मधुकर उन्हाळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
महासंघाने याबाबत अवगत केले की, कार्यरत सर्व शिक्षकांसाठी TET उत्तीर्ण करणे अनिवार्य करणाऱ्या या निर्णयामुळे देशभरातील सुमारे २० लाख शिक्षकांच्या सेवासातत्य, पदोन्नती आणि उपजीविकेवर गंभीर संकट निर्माण झाले आहे.
महासंघाच्या महामंत्री प्रा.गीता भट्ट यांनी सांगितले की, NCTE च्या २३ ऑगस्ट २०१० रोजीच्या अधिसूचनेत स्पष्ट नमूद केले आहे की बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम (RTE), २००९ च्या कलम २(एन) अंतर्गत इयत्ता १ ते ८ पर्यंत शिक्षक म्हणून नियुक्तीसाठी आवश्यक किमान पात्रता ही अधिसूचनेच्या तारखेपासून लागू राहील. त्यामुळे महासंघाने असा आग्रह व्यक्त केला की सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा भविष्यातील नियुक्त्यांकरिता लागू व्हावा, पूर्वलक्षी (पूर्वव्यापी) स्वरूपात नव्हे.
महासंघाने पुढे असेही नमूद केले की RTE अधिनियम विविध राज्यांमध्ये भिन्न वर्षांमध्ये लागू करण्यात आला आहे, त्यामुळे प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र कट- ऑफ वर्ष निश्चित करणेच न्याय्य ठरेल त्याचबरोबर वैध पात्रतेवर नियुक्त झालेल्या अनुभवी शिक्षकांच्या सेवासातत्य,वरिष्ठता आणि प्रतिष्ठेचे रक्षण केले जावे, तसेच सेवा समाप्ती किंवा पदोन्नतीवर कोणताही प्रतिकूल परिणाम होऊ नये यासाठी आवश्यक कायदेशीर उपाययोजना करण्यात याव्यात.
प्रा.भट्ट यांनी असेही म्हटले की महासंघ शिक्षणाच्या गुणवत्तेच्या आणि मानकांच्या संरक्षणासाठी पूर्णतः वचनबद्ध आहे,परंतु त्याच वेळी त्या शिक्षकांच्या अधिकारांचे आणि आत्मसन्मानाचे रक्षण करणे तितकेच आवश्यक आहे,ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य या महान सेवेसाठी अर्पण केले आहे.
या शिष्टमंडळामध्ये संघटन मंत्री महेंद्र कपूर,महामंत्री प्रा.गीता भट्ट,अतिरिक्त महामंत्री मोहन पुरोहित उपाध्यक्ष पवन मिश्रा तेलंगणा प्रांताध्यक्ष हनुमंत राव आणि तमिळनाडू प्रांत महामंत्री कंदस्वामी उपस्थित होते असे एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे शिक्षक परिषदेचे कार्यवाह पुरुषोतम काळे, प्रांत संघटन मंत्री सुरेश दंडवते, राज्य कार्याध्यक्ष किरण कुंभार यांनी कळविले आहे.

