आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करून शांततेत निवडणूक पार पाडावी – निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर
९५ हजार ५५९ मतदार बजावणार मतदानाचा हक्क, निवडणूक प्रक्रियेसाठी ७५० अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक
पंढरपूर/उमाका/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३ नोव्हेंबर — राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम ४ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी नामनिर्देशन प्रक्रिया सुरू झाली असून, निवडणूक प्रक्रियेत सहभागी सर्व राजकीय पक्ष, पदाधिकारी, इच्छुक उमेदवार तसेच अधिकारी-कर्मचारी यांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करून शांततेत निवडणूक पार पाडावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर यांनी केले आहे.

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष आणि निर्भय ठेवण्यासाठी प्रशासनाने भरारी पथके, स्थिर निरीक्षण पथके आणि व्हिडिओ सर्वेक्षण पथके सक्रिय केली आहेत. तसेच आचारसंहिताभंगाच्या तक्रारींसाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
पंढरपूर नगरपरिषद क्षेत्रात एकूण ९५,५५९ मतदार असून त्यात ४७,१९४ पुरुष, ४७,३४७ महिला आणि १८ इतर मतदारांचा समावेश आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी ७५० अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
यामध्ये ९७ मतदान केंद्रांवर केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, शिपाई व पोलीस अशा एकत्रित ५८२ कर्मचाऱ्यांची नेमणूक झाली आहे. तसेच दहा राखीव पथकेही तयार ठेवण्यात आली आहेत.

दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर व्हिलचेअर व रॅम्पची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. नामनिर्देशन १७ नोव्हेंबरपर्यंत स्वीकृत होतील, छाननी १८ नोव्हेंबरला होईल, नामनिर्देशन मागे घेण्याची मुदत १९ ते २१ नोव्हेंबर असेल.
निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम यादी २६ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होईल. २ डिसेंबर रोजी मतदान व ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी व मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.
