जिल्ह्यात १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान कुष्ठरोग शोध मोहीम


नागरिकांनी घरोघरी सर्वेक्षणात सहकार्य करावे – जिल्हाधिकारी अमोल येडगे

कुष्ठरोग शोध मोहीम १७ नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील ३५ लाख नागरिकांची तपासणी

कोल्हापूर /जिमाका,दि.१५/११/२०२५ : जिल्ह्यातील नागरिकांना कुष्ठरोगाबाबत जागरूक करण्यासाठी आणि रुग्णांचे लवकर निदान करण्याच्या उद्देशाने १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५ या कालावधीत कुष्ठरोग शोध मोहीम राबवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सर्व नागरिकांनी घरोघरी येणाऱ्या सर्वेक्षण पथकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

कुष्ठरोग हा मायकोबॅक्टेरियम लेप्री या जिवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. संसर्गित रुग्णाच्या खोकल्यातून किंवा शिंकण्यातून हे जंतू हवेत पसरतात. या आजाराचा अधिशयन कालावधी साधारण ३ ते ५ वर्षे असला तरी काही वेळा ३० ते ४० वर्षांपर्यंतही लक्षणे उशीरा दिसू शकतात. या आजारावर सध्या लस उपलब्ध नसली तरी लवकर निदान व वेळेवर उपचार केल्यास कुष्ठरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो.
कुष्ठरोगाची प्रमुख लक्षणे:
- अंगावरील फिकट/लालसर चट्टा बधिर होणे
- गाठी किंवा न दुखणाऱ्या, न बऱ्या होणाऱ्या जखमा
- कानाच्या पाळ्या जाड होणे
- भुवयांचे केस विरळ होणे
- त्वचेची मज्जातंतू जाड होणे आणि दुखणे
- हातापायात मुंग्या येणे किंवा अशक्तपणा
- हातातून वस्तू पडणे, चप्पल गळणे
- डोळा सतत उघडा राहणे इत्यादी
कुष्ठरोग हा शाप,पाप किंवा अंधश्रद्धेमुळे होत नाही तर तो फक्त जंतूमुळे होतो यावर जिल्हाधिकाऱ्यांनी भर दिला. २०२७ पर्यंत जिल्हा कुष्ठमुक्त करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
मोहीमेसाठी व्यापक तयारी:
जिल्ह्यातील १००% ग्रामीण व ३०% शहरी जोखीमग्रस्त भागातील नागरिकांची तपासणी केली जाणार आहे.
- एकूण लोकसंख्या तपासणीचे लक्ष्य: ३५,९४,४९३
- पथके: २,६८४
- पर्यवेक्षक: ५३७
प्रत्येक पथकात एक महिला कार्यकर्ती व एक पुरुष आरोग्य सेवक/स्वयंसेवक असेल. स्त्रियांची तपासणी महिला, पुरुषांची तपासणी पुरुष सदस्यांद्वारेच केली जाईल.
जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी सर्व नागरिकांनी शारीरिक तपासणी करून घेऊन जिल्हा कुष्ठमुक्त करण्यास हातभार लावावा, असे आवाहन केले आहे.






