पिंपरी चिंचवड येथे 15 वर्षीय मुलाने ऑनलाइन गेमिंगपायी 14 व्या मजल्यावरून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.एका गेमममध्ये बाल्कनीतून उडी मारायचा एक टास्क होता. तो फॉलो करायच्या नादात या मुलाचा जीव गेला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.
पिंपरी चिंचवड येथील किवळे या भागात ही घटना घडली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हा मुलगा ऑनलाइन गेम्सच्या आहारी गेला होता.
25 जुलै रोजी त्याच्या शाळेला पावसामुळे सुट्टी होती. तो संपूर्ण दिवस त्याने गेम खेळण्यात घालवला.
अनेकदा विनंती केल्यावर तो जेवायला बाहेर आला. जेवण झाल्यावर तो पुन्हा खोलीत गेला. त्याच्या लहान भावाला ताप आल्यामुळे त्याची आई जागीच होती.
रात्री एक वाजता सोसायटीच्या ग्रुपवर एक मुलगा रक्ताच्या थारोळ्यात खाली पडल्याचा मेसेज आला. मुलाच्या आईला शंका आली म्हणून की मुलाच्या खोलीत गेली. खोली आतून बंद होती.
दुसरी किल्ली घेऊन त्या आत गेल्या पण मुलगा आत नव्हता. रक्ताच्या थारोळ्यात तो खाली पडलेला दिसला. मुलाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
घरात गेममध्ये असलेल्या कोडची काही कागदपत्रं सापडली आहेत. त्यात उडी मारणं असा टास्क होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री साडेबारा वाजता या मुलाने हे कृत्य केलं आहे. प्राथमिक तपासानुसार हा मुलगा मोठ्या प्रमाणात गेम्स खेळत होता असं निष्पन्न झालं आहे.
आत्महत्येआधी मिळालेल्या चिठ्ठीनुसार XD नावाचा एक गेम आहे असं दिसतंय. यासंबंधी आमचे अधिकारी पुढील तपास करत आहे. असं पोलीस म्हणाले.
त्याच्या खोलीतून काही स्केचेस सापडले आहेत. तेही पोलिसांनी जप्त केले आहेत.
दरम्यान, मोबाइल वापरताना पॅरेंटल कंट्रोल आणि डिजिटल वेलबिंग नावाच्या अॅपचा वापर करून आपल्या मुलांचा स्क्रीनटाइमचा वापर मर्यादित करा, आणि आपली मुलं काय पाहतात यावर लक्ष ठेवायला हवं, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
या मुलाच्या आईने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं, “गेल्या सहा महिन्यापासून त्याचं वागणं बदललं होतं. त्याला काहीही विचारलं तरी तो विचित्र उत्तरं द्यायचा. त्याच्या हातून लॅपटॉप घेतला की तो एकदम आक्रमक व्हायचा. तो अगदी लहानसहान गोष्टींना घाबरायचा. अगदी जिना उतरताना सुद्धा तो अतिशय काळजीपूर्वक उतरायचा.
“पण तो अचानक मला चाकू मागायला लागला. आगीला तो घाबरेनासा झाला. तो हे पाऊल उचलेल असं मला कधीही वाटलं नव्हतं. सरकारने याबद्दल काळजी घ्यायला हवी. कारण मुलांना काहीच कळत नाही त्यामुळे मुलांपर्यंत या गोष्टी पोहोचू नयेत याची काळजी सरकारने घेणं आवश्यक आहे. VPN वर सगळं दिसू शकतं. माझ्या मुलाबरोबर जे झालं ते इतरांबरोबर होऊ देऊ नका, सगळ्यांना सुरक्षित नेटवर्क पोहोचवा. माझी सरकारलाही कळकळीची विनंती आहे.”
मुलाच्या वडिलांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, “मुलांना आजकाल सगळं समजतं. पॅरेंटल कंट्रोल असला तरी मुलं तो कोड सहज क्रॅक करतात. बरेचदा मुलं ऑनलाइन अभ्यास करण्याच्या नादात लॅपटॉपवर बसतात. त्यामुळे ते नक्की तिथे काय पाहतात हे समजत नाही कारण हिस्ट्रीसुद्धा डिलिट करतात. पालकांना मुलांवर 24 तास लक्ष ठेवणं शक्य नाही.
“माझा मुलगा अभ्यासातही चांगला होता. पण ही मुलं काय काय करतात, ते काहीच कळत नाही. माझ्या मुलाचे दोन जीमेल आयडी आहेत हे मला आज कळलं. एक आहे हे माहिती होतं. पण दुसऱ्या आयडीत तर त्याचं नाव आहे हे सुद्धा माहिती नव्हतं.”
मुलगा कोणता गेम खेळत होता हे अद्याप आई वडिलांना आणि पोलिसांनाही नीटसं कळलेलं नाही.
त्याबद्दल अधिक तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
व्हीडिओ गेम्स आणि हिंसा
याविषयी बोलताना ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शुभांगी पारकर सांगतात, “या सीरिज पाहणाऱ्या किंवा गेम्स खेळणाऱ्या मुलांबद्दल बोलायचं झालं, तर त्यांची इमोशनल किंवा सोशल मॅच्युरिटी म्हणजे समज प्रगल्भ झालेली नसते. बाहेरच्या जगात घडणाऱ्या गोष्टींचा External Stimulus चा त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीवर परिणाम होत असतो.
या घडामोडी त्यांच्या आयुष्याचा एक भाग बनून जातात. हे चूक किंवा बरोबर, हिंसा कितपत योग्य याचं विश्लेषण करण्याची प्रवृत्ती तेवढी विकसित झालेली नसते. तेवढा अनुभव पाठीशी नसतो.
“यासगळ्याचा परिणाम म्हणून इमोशनल कंट्रोल म्हणजे आपल्या भावनांवरचा ताबा त्यांच्या हातातून जातो. सततच्या गेमिंगमुळे मुलं आभासी जगात शिरतात. त्यांचा वास्तविक जगाशी संबंध तुटतो.
खऱ्या जगामध्ये त्यांना कमिटमेंट कळतात, जबाबदारी कळते, आदर, प्रेमाची भाषा कळते. आभासी जगात यातलं काही नसतं. त्या आभासी जगात दाखवलं जाणारं कॅरेक्टर महत्त्वाकांक्षी असतं आणि हिंसेच्या जोरावर ते सगळं मिळवत असतं.
मुलं या कॅरेक्टरशी एकरूप होतात आणि आभासी जगातली आणि खऱ्या जगातली रेषा धूसर होते. यातून मुलं हिंसा शिकतात.”
जगण्यासाठी वा एखादी गोष्ट करण्यासाठी लायक नसाल, तर मरा असा एक संदेश यातून जातो आणि यातून हिंसेच्या, आत्महत्येच्या घटना वाढत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
गेममधलं पात्र हे जिवंत राहण्यासाठी, जिंकण्यासाठी खेळत असतं. त्यासाठी ते अडथळे पार करतं – स्वतःकडच्या शस्त्रांचा वापर करतं. हिंसा वा बळजबरीच्या जोरावर सर्व काही मिळवता येतं असा समज यातून निर्माण होतो आणि अपयश वा नकार पचवण्याची क्षमता कमी होते. लहानशा गोष्टीसाठीही मुलं अस्वस्थ होतात, चिडचिड करू लागतात.
पौगंडावस्थेत शरीरात आणि परिणामी मनामध्ये होणारे बदल,आणि गेम्सनी उभं केलेलं आभासी जग आणि लॉकडाऊनमुळे आलेल्या मर्यादा या सगळ्याचे परिणाम मानसिक आरोग्यावर दिसून येत असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
डॉ. शुभांगी पारकर म्हणतात, “मुलांमध्ये एक बंडखोर वृत्ती असते. या सगळ्या गोष्टींच्या भडिमारामुळे याला चालना मिळते. अशात कोणी आपल्याला नाही म्हटलं, दबाव आणला, सल्ले दिले तर त्यांना ते आवडत नाही. भावना आवरता न आल्याने अगदी लहानशी ठेच जरी लागली तरी ही मुलं पेटून उठतात. मग कोणतीही मर्यादा उरत नाही.”
डॉ. शुभांगी पारकर म्हणतात, “मुलांमध्ये एक बंडखोर वृत्ती असते. या सगळ्या गोष्टींच्या भडिमारामुळे याला चालना मिळते. अशात कोणी आपल्याला नाही म्हटलं, दबाव आणला, सल्ले दिले तर त्यांना ते आवडत नाही. भावना आवरता न आल्याने अगदी लहानशी ठेच जरी लागली तरी ही मुलं पेटून उठतात. मग कोणतीही मर्यादा उरत नाही.”
पिंपरी चिंचवडमधील घटनेत मुलगा अजिबात ऐकायचा नाही, सकाळी आठ वाजता खोलीत गेलेला मुलगा तीन वाजेपर्यंत अगदी पामी प्यायला उठायचा नाही असं त्या मुलाच्या आईने सांगितलं.
डॉ. श्रृती पानसे सांगतात, “मूल साधारण 14 वर्षांचं झाल्यानंतर पालकांचा तितकासा कंट्रोल राहात नाही. ते तुम्ही सांगितलेली गोष्ट ऐकतीलच असं नाही.
पालकांनी अशा परिस्थितीत काय करायचं?
पिंपरी चिंचवड घटनेतील मुलाचे वडील सांगतात की त्याचे शिक्षक सांगायचे की तो अभ्यासात चांगला आहे तरी त्याच्यावर थोडं लक्ष ठेवावं. पण किती लक्ष देणार असा प्रश्न ते उद्वेगाने विचारतात.
डॉ. पारकर सांगतात, “मुलांचं फ्रेंड सर्कल पहावं. कारण जर घोळक्यातच मिळून हे सगळं केलं जात असेल तर एकमेकांना जाब विचारला जात नाही किंवा चूक दाखवली जात नाही. कारण सगळेच ते करत असतात.”
पण मग ही सगळी परिस्थिती उद्भवण्यामध्ये दोष कोणाचा? हे टाळणं कुणाच्या हातात असू शकतं?
डॉ. पारकर म्हणतात, “कोणतंही मूल वाईट नसतं. पण त्याक्षणी त्यांचा कंट्रोल राहात नाही आणि टोक गाठलं जातं. म्हणून तुमची मुलं काय पहातायत, कोणाबरोबर पहातात, त्यांच्या रिअॅक्शन्स काय आहेत, यावर आधीपासून लक्ष ठेवा. कारण मुलं जेव्हा आक्रमक व्हायला लागतात – शाब्दिक रूपाने किंवा भावंडांमध्ये, त्यांच्यात जबरदस्त बदल होतो, हा तेव्हाच लक्षात घेतला गेला पाहिजे. ”
मुलांना कमी वयातच एखाद्या छंदात, खेळात रमवणं, त्यांच्यातल्या ऊर्जेला चालना देणं महत्त्वाचं ठरतं.
या सगळ्यासोबतच लहान वयातच मुलांसोबत मोकळेपणाने संवाद सुरू करणंही महत्त्वाचं ठरतं. मोठं झाल्यावर मुलांसाठी एखाद्या अवघड क्षणी असे पूर्वीचे संवाद निर्णायक ठरू शकतात.
डॉ. शुभांगी पारकर म्हणतात, “अनेकदा पालकांच्या मनात अपराधीपणाची मोठी भावना असते. त्यांना वाटतं मूल हातातनं गेलं आणि ते अचानक मुलांना कंट्रोल करायला सुरुवात करतात. अशावेळी संयम बाळगणं गरजेचं आहे. मुलांना समजवून द्या. इतर मुलांच्या पालकांसोबत बोलून ते काय करतायत जाणून घ्या. मुलं कोणत्या संगतीत आहेत, ते पहा. मुलांना सांगणं – बोलणं महत्त्वाचं आहे. लहान असताना मुलांना एखादं खेळणं दिलं नाही तर राग येतो, पण नंतर त्या गोष्टी समजतात. हे तसंच आहे.
डॉ. श्रृती पानसे सांगतात, “मुलांनी काहीतरी केलं तर तो संपूर्णपणे पालकांचा दोष आहे, असं मी म्हणणार नाही. किंवा पालकच तसे म्हणून मुलांनी असं केलं, असं म्हणणंही चूक ठरेल. पालकांचं लक्ष आहे का? असं म्हणणं सोपं आहे. पण ते योग्य नाही. कारण टेक्नॉलॉजी आणि परिस्थितीने गुन्हे करणं वा घडणं एकप्रकारे फार सोपं केलंय. पटलं नाही तर मारून टाका, दुसऱ्याचं जगणं अवघड करा, असं चित्र या सध्या निर्माण होतंय.”
लहान असल्यापासून मुलांना परिस्थितीची जाणीव करून देणं, चूक-वाईट दाखवून देणं, गरजेचं असेल तेव्हा मर्यादा घालून देणं यासगळ्यासोबतच मुलांमधली निर्णयक्षमता वाढवणं खूप महत्त्वाचं असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
मुलं त्यांच्या 'Me Time' मध्ये किंवा एकटं असताना काय करतात, काय करायला हवं यावर पालकांनी लक्ष द्यायची गरज असल्याचं, डॉ. पानसे सांगतात.
त्या म्हणतात, “पालकांनी सगळ्या गोष्टी स्वतःच्या हातात ठेवू नयेत. पण मूल जे करतंय त्याचा त्यांच्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो, कोणते धोके निर्माण होऊ शकतात, याची जाणीव त्यांना करून देणं महत्त्वाचं आहे.”
किवळे येथील घटनेने ऑनलाइन गेम्स आणि त्यांचे परिणाम हा विषय ऐरणीवर आला आहे. मोबाइल, ऑनलाइन गेम्सच्या नादातून लहान मोठी कोणीच सुटलेली नाही. डिजिटल युगातल्या या सामाजिक समस्येवर तोडगा कसा काढायचा हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Published By- Priya Dixit
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.
ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------