वंदे मातरम् गीताला दीडशे वर्षे पूर्ण : हिंदु जनजागृती समितीचा राज्यव्यापी राष्ट्रभक्ती जागरण सप्ताह

वंदे मातरम् गीताला दीडशे वर्षे पूर्ण : हिंदु जनजागृती समितीचा राज्यव्यापी राष्ट्रभक्ती जागरण सप्ताह

राज्यात ६० हून अधिक ठिकाणी सामूहिक वंदे मातरम् गायन,हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि:१६.११.२०२५ –भारत राष्ट्राच्या स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणास्थान ठरलेल्या आणि कोट्यवधी भारतियांमध्ये क्रांतीची ज्वाळा चेतविणाऱ्या वंदे मातरम् गीताला यंदा १५० वर्षे पूर्ण झाली.या स्मरणार्थ हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राज्यभर विशेष राष्ट्रभक्ती जागरण उपक्रम एक सप्ताहभर आयोजित करण्यात आला.शाळा,महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी सामूहिक वंदे मातरम् गायनातून नागरिकांनी मातृभूमीप्रती अभिमान व्यक्त केला.

या उपक्रमास महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सातारा,सोलापूर,कोल्हापूर,पुणे, अहिल्यानगर,रत्नागिरी,मुंबई आदी ठिकाणी नागरिकांनी राष्ट्रध्वज आणि क्रांतीकारकांचे फलक हातात धरून वंदे मातरम् चा जयघोष केला.महाराष्ट्रासह कर्नाटक आणि गोवा राज्यांतही या उपक्रमाचा विस्तार झाला.

महाराष्ट्र राज्यातील ६० हून अधिक ठिकाणी आयोजित सामूहिक गायन कार्यक्रमात पाच हजारांहून अधिक राष्ट्रभक्त नागरिक, माजी सैनिक, शिक्षक, विद्यार्थी तसेच विविध सामाजिक आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले.कोल्हापूर येथे आमदार राजेश क्षीरसागर आणि अन्य मान्यवरांनी या उपक्रमाचे उद्घाटन करून देशभक्तीचा संदेश दिला.

हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट म्हणाले,बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेले ‘वंदे मातरम्’ हे गीत आज १५० वर्षानंतरही प्रत्येक भारतीयाच्या हृदयात राष्ट्रप्रेमाची ज्वाला चेतवत आहे. या गीताची प्रेरणा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी आम्ही शाळा आणि महाविद्यालयांमध्ये संपूर्ण ‘वंदे मातरम्’ गायले जावे, असे आवाहन करीत आहोत.

Leave a Reply

Back To Top