आरोग्यसेवेचा महोत्सव ठाण्यात,शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा ८ वा वर्धापनदिन- सेवाभाव, सन्मान व जनजागृतीचा समन्वय

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा ८ वा वर्धापनदिन : ठाण्यात सेवाभाव,आरोग्य जागृती आणि सन्मानाचा भव्य सोहळा

आरोग्यसेवेचा महोत्सव ठाण्यात,शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा ८ वा वर्धापनदिन- सेवाभाव,सन्मान आणि जनजागृतीचा समन्वय

ठाणे /ज्ञानप्रवाह न्यूज, दि.१७ नोव्हेंबर २०२५ –वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ८ वा वर्धापनदिन सोहळा मोठ्या उत्साहात आणि सेवाभावी वातावरणात पार पडणार असून समाजातील आरोग्य सेवेच्या चैतन्याला नवी दिशा देणारा हा कार्यक्रम ठरणार आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता अवयवदान जनजागृती परिसंवादाने होणार असून पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांच्या प्रेरणादायी बीजभाषणाने नेत्रदानाचे महत्त्व अधोरेखित केले जाईल. ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य (लोकसत्ता) आणि संतोष आंधळे (लोकमत) यांचे रक्तदान आणि अवयवदान विषयांवरील मार्गदर्शन या सत्राला अधिक समृद्ध करणार आहे.

दुसऱ्या सत्रात आरोग्य क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर्स लहान मुलांमधील दुर्मिळ आजार, कॅन्सरचे वाढते प्रमाण आणि आवश्यक काळजी या विषयांवर महत्वपूर्ण माहिती देणार आहेत.
— डॉ.प्रशांत उटगे (हैद्राबाद) : विशेष मुलांचे संगोपन व उपचार
— डॉ.आदित्य मानके (कॅन्सर तज्ञ) : कॅन्सर प्रतिबंधक जनजागृती

दुपारी १२ वाजता दीपप्रज्वलन, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा अष्टपूर्ती विशेषांक आणि आरोग्यदूत मासिक प्रकाशन तसेच दिव्यांग बांधवांना मोफत व्हीलचेअर व जयपूर फुट वाटप अशा सामाजिक उपक्रमांनी सोहळा अधिक मंगलमय होणार आहे.

या महत्त्वपूर्ण सोहळ्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,खासदार डॉ.श्रीकांत शिंदे,मधुकर भावे आणि राजेंद्र कोंढरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के भूषवणार आहेत.

तिसऱ्या सत्रात ज्युपिटर हॉस्पिटलचे अनुभवी डॉक्टर तरुणांमधील वाढते हृदयविकार, ASD/VSD सारखे जन्मजात हृदयविकार आणि घ्यावयाच्या काळजीविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करणार आहेत.
— डॉ. विजय सुरासे : तरुणांमधील वाढते हृदयविकार
— डॉ. आशुतोष सिंह : मुलांमधील जन्मजात हृदयविकार

कार्यक्रमाच्या अंतिम सत्रात रुग्णसेवकांचा वैद्यकीय सेवा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. रुग्णसेवेकडे निष्ठेने पाहणाऱ्या आणि प्रत्यक्ष सेवेत योगदान देणाऱ्या रुग्णसेवकांचा गौरव हा या सोहळ्याचा मुख्य केंद्रबिंदू असेल.

कक्षप्रमुख मंगेश नरसिंह चिवटे,कार्याध्यक्ष रामहरी राऊत आणि ज्ञानेश्वर घुळगंडे यांच्या प्रयत्नातून हा सेवाभावी सोहळा यशस्वीपणे आयोजित करण्यात आला आहे.

हा वर्धापनदिन सोहळा हा केवळ औपचारिक उत्सव नसून सेवेला सन्मान, आरोग्यजागृतीला बळ आणि समाजसेवेला नवा उर्जा देणारा दिवस ठरणार आहे.

Leave a Reply

Back To Top