शालेय जीवनापासून समाजसुधारणा सुरू व्हावी; पत्रकारांनी सकारात्मक बदलाचे वाहक व्हावे- राज्यपाल हरीभाऊ बागडे


पत्रकार समाजाचा आरसा; विकासात्मक वृत्तीने कार्य करा-राज्यपाल बागडे यांचे पंढरपूर कार्यशाळेत मार्गदर्शन


पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१६ (जिमाका) –समाज सुधारण्याचे कार्य शालेय जीवना पासूनच सुरू झाले पाहिजे आणि या प्रक्रियेत पत्रकारांनी सक्रिय योगदान द्यावे,असे आवाहन राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ बागडे यांनी पंढरपूर येथे व्हॉइस ऑफ मीडिया व व्हीओएम नॅशनल फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकार कार्यशाळेत मार्गदर्शन करताना केले.


या कार्यक्रमास व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रमुख संदीप काळे,उद्योजक राणा सूर्यवंशी,वरिष्ठ पत्रकार संजय आवटे, इस्कॉन पंढरपूर अध्यक्ष प्रल्हाद प्रभू, श्रीकृष्ण चैतन्य स्वामी महाराज,इस्कॉन सिकंदराबादचे अध्यक्ष सहदेव प्रभू यांच्यासह विविध जिल्ह्यांतील पत्रकार उपस्थित होते.
राज्यपाल बागडे यांनी भारतीय संस्कृतीच्या नैतिक मूल्यांचा गौरव करताना सांगितले की,प्राचीन व मध्ययुगीन इतिहासकार, अभ्यासक आणि परकीय प्रवासी यांच्या लेखनातून भारतीय संस्कृती समृद्ध आणि नैतिक मूल्यांनी युक्त होती. इंग्रजांनी १८३५ मध्ये गुलामगिरी निर्माण करणारी शैक्षणिक पद्धती आणून या मूल्यांवर घाला घातला. मात्र २०२० पासून केंद्र शासनाने शैक्षणिक धोरणात अमूलाग्र बदल करून नवसंस्कारित दिशा दिली आहे.

पत्रकारांच्या भूमिकेवर प्रकाश टाकताना त्यांनी नारद मुनी यांचा उल्लेख पहिले पत्रकार म्हणून केला आणि सांगितले की, राष्ट्र,राज्य,शहर आणि गावाच्या विकासात पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. विकासात्मक दृष्टिकोन ठेवून पत्रकारांनी काम केल्यास समाजात सकारात्मक बदल घडतो.
राज्यपालांनी प्रसारमाध्यम क्षेत्रातील विविध उदाहरणांचा दाखला देत पत्रकार समाजसुधारण्याच्या कार्यात कशी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात याचे विवेचन केले. त्यांनी नालंदा विद्यापीठाच्या आयुर्वेद शाखेचे उदाहरण देत प्राचीन भारतातील संशोधन वृत्ती आणि शिक्षण पद्धतीचे महत्त्व अधोरेखित केले. इंग्रजांच्या काळात गव्हर्नर मेकॉले यांच्या शैक्षणिक धोरणामुळे भारतीय मूल्यांवर परिणाम झाला, असेही त्यांनी नमूद केले.पत्रकार समाजाचा आरसा असून जनतेचे मत आणि गरजा राजकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य ते करतात, असे सांगून त्यांनी व्हॉईस ऑफ मीडिया संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.

कार्यक्रमात राज्यभरातील विविध जिल्ह्यांतील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान राज्यपालांच्या हस्ते करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक अनिल मस्के यांनी केले.या कार्यक्रमाची सुरुवात व समारोपही राष्ट्रगीताने करण्यात आला.






