प्रेरणा उपक्रमाची सुरूवात : रायगड पोलीसांकडून आदिवासी मुलांना उज्ज्वल भविष्याची हाक
बालदिनानिमित्त प्रेरणा उपक्रमाची सुरूवात; अंधश्रद्धा,बालविवाहाविरुद्ध जनजागृती
रायगड पोलिसांचा अनोखा उपक्रम : आदिवासी मुलांसाठी प्रेरणा चळवळ

रायगड |ज्ञानप्रवाह न्यूज,दि.14 नोव्हेंबर — रायगड पोलीस अधीक्षक श्रीमती ऑंचल दलाल यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या प्रेरणा – एक पाऊल प्रकाशाकडे या उपक्रमाची आदिवासी समाजात मोठी दखल घेतली जात आहे. आदिवासी समाजातील पूर्वापार चालत आलेल्या अनिष्ट रूढी, अंधश्रद्धा, बालविवाह अशा सामाजिक समस्यांपासून मुक्तता मिळवून मुलांनी उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
बालदिनाचे औचित्य साधून वावळोली आश्रमशाळा येथे सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत एक दिवसीय व्यापक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात विविध सामाजिक, आरोग्यविषयक, शैक्षणिक आणि प्रेरणादायी सत्रांचा समावेश होता.

पथनाट्य- बालविवाहावरील प्रभावी संदेश
देव डान्सिंग अकॅडमी पेणचे संचालक सुभाष पाटील आणि त्यांच्या टीमने आदिवासी समाजात घडणाऱ्या वास्तविक समस्यांवर आधारित पथनाट्य सादर केले. बालविवाहामुळे मुला-मुलींच्या आयुष्यावर होणारे गंभीर परिणाम त्यांनी प्रभावी अभिनयातून दाखवले.
वैद्यकीय मार्गदर्शन – बालविवाहाचे दुष्परिणाम समजावले
वैद्यकीय अधिकारी सौ. मालवणकर यांनी बालविवाहामुळे होणारे आरोग्यदोष, मातामृत्यूची जोखीम, कुपोषण, गर्भपात यांचे वैज्ञानिक विवेचन केले. तसेच, कायद्यांनुसार बालविवाह हा गुन्हा असल्याचेही विद्यार्थ्यांना सांगितले.

भोंदूगिरीचा पर्दाफाश- विज्ञानाची ताकद प्रत्यक्ष दाखवली
अंधश्रद्धेमुळे भोंदूबाबांच्या फसवणुकीला बळी पडणाऱ्या समाजाला जागृत करण्यासाठी करूण हंबीर निवृत्त प्रयोगशाळा सहाय्यक डॉ.होमी भाभा विज्ञान केंद्र यांनी विविध प्रयोगांद्वारे भोंदूगिरीचे खरे स्वरूप उघड केले. वेळेत उपचार न मिळाल्याने होणाऱ्या जीवित हानीबद्दलही त्यांनी विद्यार्थ्यांना जागृत केले.

करिअर मार्गदर्शन-भविष्याची दिशा स्पष्ट
करिअर कौन्सिलर संजय सावंत यांनी विद्यार्थ्यांना आपल्या गुणांनुसार शिक्षण आणि करिअरची दिशा कशी ठरवावी याबाबत मार्गदर्शन केले.
आदिवासी समाजातून पुढे येऊन यश संपादन केलेल्या करूण हंबीर, नयन वाघ, धनाजी कुहाडे (Jr. Scientific Officer) यांनी आपली संघर्षमय जीवनकथा विद्यार्थ्यांसमोर मांडून त्यांना प्रेरित केले.

शिवव्याख्यान — इतिहासातून ऊर्जा
शिवव्याख्याते राजेश गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनचरित्रावर प्रभावी व्याख्यान देऊन विद्यार्थ्यांमध्ये नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण केला.

900 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
या उपक्रमात जवळपास 900 आदिवासी विद्यार्थी उपस्थित होते. पोलीस अधीक्षक श्रीमती आचल दलाल यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.या चळवळीचा एकंदर उद्देशप्रेरणा’ ही फक्त एक योजना नाही, तर आदिवासी समाजातील मुलांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि वैचारिक प्रगतीसाठी उभारलेली एक व्यापक चळवळ आहे. अंधश्रद्धा आणि बालविवाहाचा त्याग करून शिक्षण, विज्ञान आणि प्रगतीच्या दिशेने समाजाने वाटचाल करावी, हा यामागील मूलभूत हेतू आहे.

