मोहोळ नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्या: खासदार प्रणिती शिंदे
महिलांवरील अत्याचार रोखण्यात सरकार अपयशी

मोहोळ/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८/११/ २०२५– मोहोळ नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मोहोळ शहरातील गवत्या मारुती चौकात जाहीर सभा पार पडली.या सभेस खासदार प्रणिती शिंदे,जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार, तालुका व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी तसेच नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार,तालुकाध्यक्ष सुलेमान तांबोळी, जिल्हा उपाध्यक्ष राजेश पवार,राज्य सचिव शाहिनताई शेख, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अँड सोनल जानराव, उमेदवार संतोष शिंदे, कामिनी चोरमले, रोहित तावस्कर, शरयू आनंद गावडे, महमद जुबेर मुजावर आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक तालुकाध्यक्ष सुलेमान तांबोळी यांनी केले.

अपयशी सरकारला पुन्हा संधी देऊ नका – खासदार प्रणिती शिंदे
सभेला संबोधित करताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या सध्याचे सरकार योजना जाहीर तर करते, पण त्या प्रत्यक्षात जनतेपर्यंत पोहोचत नाहीत. आज देशात बेरोजगारी प्रचंड वाढली आहे, नोकऱ्या नाहीशा होत आहेत, महागाई अनियंत्रित झाली आहे. आरोग्य व्यवस्था ढासळलेली आहे आणि महिलांवरील अत्याचार चिंताजनक पातळीवर आहेत. भ्रष्टाचार दिवसेंदिवस वाढत आहे. अशा अपयशी सरकारला पुन्हा सत्तेची संधी देणार आहात का? काँग्रेस पक्षाचा १४० वर्षांचा त्याग, बलिदान आणि लोककल्याणाचा इतिहास असल्याचे सांगत काँग्रेसने कधीही योजना अर्धवट ठेवल्या नाहीत. जनतेपर्यंत लाभ पोहोचवणे हेच आमचे ध्येय राहिले आहे, असे त्या म्हणाल्या.मोहोळ शहराच्या विकासासाठी नगरपरिषदेत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन खासदार प्रणिती शिंदे यांनी केले.

काँग्रेसने देशाला विकासाचा पाया दिला–सातलिंग शटगार
जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांनी राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर जोरदार टीका केली. निवडणुकी पूर्वी देण्यात येणारे लाभ आज अनेक महिलांना मिळत नाहीत. ही योजना जाहिरातीपुरती उरली असून मोठा महिला वर्ग वंचित आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील देशाच्या विकासाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा लोकसंख्या ३५ कोटी होती.अन्नधान्याचा पुरवठा ही मोठी समस्या होती. परंतु पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचवार्षिक योजनांद्वारे देशात धरणे उभारली, सिंचनव्यवस्था मजबूत केली आणि हरितक्रांती शक्य झाली.भाक्रानांगल सारखी मोठी धरणे, औद्योगिकरण, आरोग्य, शिक्षण—या सर्व क्षेत्रात काँग्रेसने भारताला मार्गदर्शक दिशा दिली.

सातलिंग शटगार पुढे सांगितले, या देशाला काँग्रेसचाच पर्याय आहे. मोहोळचा विकास काँग्रेसच करू शकते. म्हणून सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या.
या जाहीर सभेत सर्व काँग्रेस उमेदवारांनी मनोगत व्यक्त करून निवडून देण्याची विनंती केली.
मारुती चौक परिसरात नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. उत्साह, घोषणाबाजी यामुळे सभेला मोठा प्रतिसाद मिळाला.

