भारतीय संविधान असताना देशात अराजकता कधीच निर्माण होऊ शकत नाही – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०८/१२/२०२५ : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आयोजित जाहीर अभिवादन सभेत बोलताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी देशाच्या सुरक्षेबाबत मोठे विधान केले.

ना.रामदास आठवले म्हणाले की नक्षलवाद,खलिस्तान चळवळी,शेतकरी- कामगार आंदोलन,नामांतर चळवळ… कितीही मोठी आंदोलने झाली तरी भारतात अराजकता निर्माण होऊ शकत नाही.कारण देशात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले अद्वितीय संविधान आहे आणि हेच संविधान भारताला स्थैर्य व दिशा देत आहे.
रिपब्लिकन ऐक्याची महत्त्वपूर्ण हाक
ना.आठवले यांनी आवाहन केले की आज निळा झेंडा घेऊन अनेक गट काम करतात,ही चांगली गोष्ट आहे. पण वेगवेगळ्या झेंड्यांनी विखुरलेली शक्ती नको.सर्वांनी एकत्र येऊन एकच निळा झेंडा घेऊन रिपब्लिकन ऐक्य घडवावे. खरे कार्यकर्ते असाल तर गोरगरिबांसाठी राबा; नाहीतर बाबा तुम्हाला आशीर्वाद देणार नाहीत — अशा चारोळीने त्यांनी कार्यकर्त्यांना संदेश दिला.

चैत्यभूमी विकासाची जाहीर मागणी
सभा संबोधित करताना आठवले म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अंतिम संस्कार दिल्लीऐवजी मुंबईत दादर समुद्रकिनारी झाले.त्या स्मृतीस्थळावर उभारलेला चैत्यभूमी स्तूप आता जीर्ण झाला आहे.दीक्षाभूमीप्रमाणे येथेही भव्य स्तूप उभारण्याची आवश्यकता आहे आणि चैत्यभूमी ते इंदुमिल असा समुद्रकिनारी रस्ता व्हावा,अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली.
अनेक गटांच्या सभा यावेळी असल्याने याप्रसंगी मोठ्या प्रमाणावर गोंधळ सुरू होता त्यावर ना. रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली.शिवाजी पार्कवर एकाच वेळी अनेक सभांचे लाऊडस्पीकर सुरू असल्याने झालेल्या गोंधळावरून त्यांनी म्हटले की महाड येथील चवदार तळ्यासारखेच येथेही प्रत्येक संघटनेच्या सभेला वेगळ्या वेळा द्याव्यात.पुढील वर्षी पोलिस प्रशासनाने विशेष खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.
या कार्यक्रमस्थळी सौ.सीमाताई आठवले,अविनाश महातेकर,गौतम सोनवणे,काकासाहेब खंबाळकर,सुरेश सावंत,ॲड.आशाताई लांडगे,शिलाताई गांगुर्डे,परशुराम वाडेकर,उत्तम कांबळे, सूर्यकांत वाघमारे,बाळासाहेब गरुड, संजय भिडे आदी मान्यवर उपस्थित होते.सभेचे सूत्रसंचालन विवेक पवार यांनी केले.

