अधिवेशनकाळात पत्रकारांसाठी सक्षम सुविधा द्या — विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे
डॉ.नीलम गोऱ्हे – विधिमंडळ पत्रकारांसाठीच सुयोगचा वापर असावा,अधिवेशनानंतर पत्रकारांसाठी विशेष ट्रेन चालवण्याचा प्रस्तावही
नागपूर,दि.०७ डिसेंबर २०२५ : येथील सुयोग पत्रकार निवासस्थानाची विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे आणि उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पाहणी केली. अधिवेशन ८ डिसेंबरपासून सुरु होत असताना पत्रकारांच्या निवास, सुरक्षाव्यवस्था, आरोग्यसेवा,इंटरनेट सुविधा आदींचा प्रत्यक्ष आढावा घेत आवश्यक सुधारणा तातडीने करण्याचे निर्देश सभापती यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
पत्रकारांनी मांडलेल्या समस्या, निवास क्षमता, आरोग्यसेवा, इंटरनेट सुविधा आणि महिला पत्रकारांच्या सुरक्षेच्या मुद्द्यांवर दोन्ही मान्यवरांनी विशेष लक्ष दिले.
प्रा.राम शिंदे म्हणाले, पत्रकारांच्या सेवांमुळेच लोकशाही सक्षम राहते; म्हणूनच अधिवेशनकाळात त्यांची प्रत्येक गरज प्राधान्याने पूर्ण करू.

तर डॉ.नीलम गोऱ्हे यांनी विधिमंडळ पत्रकारांसाठीच सुयोगचा वापर असावा असे स्पष्ट करत अधिवेशनानंतर पत्रकारांसाठी विशेष ट्रेन चालवण्याचा प्रस्तावही पुढे आणला.
अधिवेशनकाळात पत्रकारांना सुलभ, सुरक्षित व सुबक व्यवस्था उपलब्ध करणे ही आमची प्राथमिकता आहे,असे प्रा.राम शिंदे यांनी स्पष्ट केले.
उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी महिलांसाठी निवास,रेल्वे तिकीट सुविधा, प्रशासनिक समन्वय तसेच इंटरनेट कनेक्टिव्हिटीचे प्रश्न याबाबत सविस्तर माहिती घेऊन सुधारणा तत्काळ करण्याची आवश्यकता व्यक्त केली. वार्तांकनासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे ही आपली सामायिक जबाबदारी आहे,असे त्यांनी नमूद केले.
पत्रकारांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांवर सकारात्मक दृष्टीकोन ठेवत डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की,सुयोग निवास स्थानाचा वापर फक्त विधिमंडळ पत्रकारांसाठी असावा तसेच अधिवेशना नंतर पत्रकारांसाठी विशेष ट्रेन सोडण्याचा प्रस्तावही सरकारकडे विचाराधीन आहे.
या पाहणीदरम्यान विधानमंडळ सचिव जितेंद्र भोळे, विलास आठवले, शिवदर्शन साठे,जनसंपर्क अधिकारी निलेश प्रमुख तसेच मंत्रालय–विधिमंडळ वार्ताहर संघाचे प्रतिनिधी आणि राज्यभरातील पत्रकार उपस्थित होते.

