दिव्यांगांच्या न्यायासाठी पंढरपूरमध्ये आमरण उपोषण; थकीत निधी व स्वयंरोजगाराच्या मागण्यांवर ठाम भूमिका
हक्क मिळेपर्यंत उपोषण थांबणार नाही — दिव्यांग बांधवांचे पंढरपुरात आंदोलन
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज | १० डिसेंबर २०२५ – दिव्यांग बांधवांच्या हक्कांसाठी आवाज उठवत चार उपोषणकर्त्यांनी यात नामदेव विश्वनाथ खेडेकर,बापूसाहेब विलास जवळेकर,उषा पांडुरंग देशमाने आणि पांडुरंग बलभिम देशमाने यांनी आज सकाळी ११ वाजल्यापासून पंचायत समिती कार्यालय पंढरपूर येथे आमरण उपोषण सुरू केले आहे.

दिव्यांगांच्या प्रलंबित योजनांवरील दुर्लक्ष, थकीत निधी आणि स्वयंरोजगारासाठी आवश्यक जागांची अनुपलब्धता या गंभीर प्रश्नांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण सुरू करण्यात आले आहे.
प्रमुख मागण्या
५% दिव्यांग कल्याण निधी तातडीने वितरित करावा
गेल्या पाच वर्षांपासून निधी थकीत असल्याने दिव्यांग बांधवांवर आर्थिक अडचणींचे संकट निर्माण झाले आहे.
ग्रामसेवक व सरपंचांवर शिस्तभंग कारवाई करावी –
सन २०२०–२०२५ या कालावधीत निधी रोखून धरणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी.
स्वयंरोजगारासाठी गाळे उपलब्ध करून द्यावेत –
दिव्यांगांनी स्वतःचा उदरनिर्वाह करावा यासाठी शहरात प्राधान्याने योग्य जागी गाळ्यांची सोय करण्यात यावी.

उपोषणकर्ते नामदेव खेडेकर म्हणाले, दिव्यांगांना कायदेशीर हक्क असूनही योजनांचा लाभ मिळत नाही. अनेक वर्षे निधी अडवून ठेवल्याने दिव्यांग बांधवांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच राहील.
उपोषणाच्या पहिल्याच दिवशी अनेक दिव्यांग बांधवांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी उपोषणस्थळी भेट देऊन ऐक्य व्यक्त केले. प्रशासन या मागण्यांकडे कोणत्या भूमिकेतून पाहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

