कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत दक्ष रहा – मंत्री विजय वडेट्टीवार
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत दक्ष रहा – मंत्री विजय वडेट्टीवार Beware of a possible third wave of corona -Minister Vijay Vadettiwar
शेळवे /सोलापूर ,संभाजी वाघुले ,३१/०८/२०२१: जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. ही समाधानाची बाब आहे, मात्र संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत प्रत्येक यंत्रणेने दक्ष राहण्याच्या सूचना मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज येथे दिल्या.
श्री.वडेट्टीवार यांनी शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील कोरोना स्थिती, आश्रमशाळा,कायदा व सुव्यवस्था,चारा छावणीबाबत आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला आमदार प्रणिती शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महानगर पालिका आयुक्त पी.शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार,पोलीस उपायुक्त डॉ.वैशाली कडूकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव, समाज कल्याणचे सहायक आयुक्त कैलास आढे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव संपलेला नसल्याने सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती काळजी घेऊन उपाययोजना कराव्यात. कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तविली असून लहान मुले बाधित होण्याची शक्यता असल्याने त्यांच्या उपचारास आवश्यक हॉस्पिटलची निर्मिती,मुबलक औषधसाठा उपलब्ध ठेवावा.लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. कोरोनासाठी काही कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करणे हिताचे आहे, असे आवाहनही त्यांनी केले.
सेटलमेंटमध्ये म्हाडाच्या घराचा प्रस्ताव, सांस्कृतिक सभागृहाचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या.
जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी चारा छावण्यांच्या निधीबाबत सांगितले. यावर श्री. वडेट्टीवार यांनी प्रस्तावाला मंत्रालय स्तरावरून मान्यता देण्यात येईल, असे सांगितले.
जिल्ह्यातील आश्रमशाळांच्या गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करा. टॅबचे संनियंत्रण करा, तांडा वस्तीचा प्रस्ताव , घरकुलांच्या 30 कोटींच्या प्रस्तावाला मंत्रालयस्तरावरून मंजुरी देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबतही मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आढावा घेतला. कोरोना महामारीतील गुन्ह्यांचे प्रमाण, महिलांवरील अत्याचाराबाबत त्यांनी श्रीमती सातपुते यांच्याकडून माहिती घेतली.
सोलापूर शहराच्या पाण्याबाबत योग्य नियोजन करून पुनर्वापर प्रक्रिया राबवा. ग्रीन बिल्डींगसाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केल्या.
मुलांना संभाव्य धोका ओळखून जिल्ह्यात 1400 बेडची क्षमता तयार केली आहे. यामध्ये 1200 शासकीय, खासगी आणि सिव्हीलमध्ये 100 साधे, 50 अतिदक्षता बेडची क्षमता तयार ठेवली आहे. जी मुले नियमित लसीकरणापासून वंचित आहेत, त्यांचे इंद्रधनुष्यमध्ये पूर्ण लसीकरण करण्यात येणार आहे. कुपोषित बालके, गरोदर माता आणि कोमॉरबिड रुग्ण, दुर्धर आजाराची बालके यांच्या घरातील 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याचे नियोजन असल्याची माहिती देण्यात आली.