पुणे महापालिका निवडणूक : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बजावला मतदानाचा हक्क
निर्भय मतदान ही लोकशाहीची ताकद – मतदानानंतर डॉ.नीलम गोऱ्हेंचे आवाहन
Pune mahanagarpalika election पुणे | ज्ञानप्रवाह न्यूज | दि.१५ जानेवारी २०२६: महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज पुणे महानगर पालिका निवडणुकीसाठी सिम्बॉयसिस शाळेतील मतदान केंद्रावर सकाळी साडेदहाच्या सुमारास आपला मतदानाचा हक्क बजावला.मतदानानंतर त्यांनी मतदान केंद्राची पाहणी करत प्रशासनाच्या व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले, मात्र काही बाबींवर सुधारणा आवश्यक असल्याचे मतही मांडले.
माध्यमांशी बोलताना डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या,मतदान हा लोकशाहीचा कणा आहे. प्रत्येक नागरिकाने निर्भयपणे आपला मतदानाचा हक्क बजावणे हे मूलभूत कर्तव्य आहे.पुणे शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी मतदान केले आहे.प्रशासनाने एकूणच मतदानासाठी चांगली व्यवस्था केली असली तरी ज्येष्ठ नागरिकांसाठी पायऱ्यांवरून जाण्याची योग्य सोय नसल्याने अडचणी येत आहेत. सिम्बॉयसिस शाळेतील मतदान केंद्रावर अनेक ज्येष्ठ मतदारांची नावे असल्याने त्यांच्यासाठी विशेष सुविधा असणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

डॉ.गोऱ्हे यांनी राज्यातील निवडणूक वातावरणावर भाष्य करताना सांगितले की,कालपर्यंत काही ठिकाणी वातावरण तणावपूर्ण होते, मात्र आता मतदारांमध्ये मतदानाबाबत जागरूकता वाढली आहे. मतदार कोणत्याही दबावाशिवाय निर्भयपणे मतदान करतील, याची मला खात्री आहे.
मतदान केंद्रांच्या पाहणीनंतर त्यांनी मोबाईल बंदीबाबतही प्रशासनाचे लक्ष वेधले. काही ठिकाणी मोबाईल आत नेण्याबाबत कडक नियम असल्याने मतदारांना मोबाईल ठेवण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्यामुळे त्रास होत आहे, परिणामी काही मतदार मतदान न करता परत जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावर प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
पुणे महानगरपालिका निवडणुकीत विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सिम्बॉयसिस शाळेत मतदान केले. मतदानानंतर त्यांनी ज्येष्ठ नागरिक व मोबाईल व्यवस्थेबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले.






