माघवारी यात्रेपूर्वी अहिल्या पुलावरील संरक्षक कठडे तात्काळ दुरुस्त करा – प्रांताधिकारी सचिन इथापे

माघवारी यात्रेपूर्वी अहिल्यापुलावरील संरक्षक कठडे तात्काळ दुरुस्त करा – प्रांताधिकारी सचिन इथापे

माघ शुद्ध एकादशी यात्रेसाठी पंढरपुरात जय्यत तयारी:अहिल्यापुल सुरक्षेवर प्रांताधिकाऱ्यांचा भर

माघ शुद्ध एकादशी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील अहिल्यापुलावरील नादुरुस्त संरक्षक कठडे तात्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिल्या.यात्रा नियोजनाबाबत प्रांत कार्यालयात आढावा बैठक पार पडली

Pandharpur yatra news: पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि. 21 जानेवारी 2026- माघ शुद्ध एकादशी निमित्त 29 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या माघवारी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात सुरक्षितता व सुविधा यांचा आढावा घेत अहिल्यापुलावरील नादुरुस्त संरक्षक कठडे तात्काळ दुरुस्त करून मजबूत संरक्षक कठडे उभारावेत तसेच पुलावर प्रखर प्रकाश व्यवस्था करावी,अशा स्पष्ट सूचना प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिल्या.

माघवारी यात्रा कालावधी 23 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2026 असा असून या काळात श्री विठ्ठल–रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुरात तीन ते चार लाख वारकरी भाविक दाखल होतात. अहिल्या पुला वरून भाविक व वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याने कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.

माघवारी पूर्वनियोजनाबाबत प्रांत कार्यालय पंढरपूर येथे आयोजित बैठकीस मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके,उपकार्यकारी अभियंता भीमाशंकर मेटकरी, मुख्याधिकारी महेश रोकडे, पंढरपूर शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे, मंदिर समितीचे लेखाधिकारी मुकेश आनेचा यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी सांगितले की,यात्रा कालावधीत चंद्रभागा नदीपात्रात पवित्र स्नानासाठी पाटबंधारे विभागाने आवश्यक पाणी सोडण्याचे नियोजन करावे.नगरपालिकेने स्वच्छ पिण्याचे पाणी, वाळवंटाची स्वच्छता, पुरेशी प्रकाश व्यवस्था सुनिश्चित करावी.
अतिक्रमणे काढून बोअरवेल व हातपंपाच्या पाण्याची तपासणी करावी.
नदीपात्रात वाहने येऊ नयेत यासाठी बॅरिकेडिंग करावी.अग्निशामक यंत्रणा सज्ज ठेवावी व सुलभ शौचालयांजवळ मुबलक पाणी उपलब्ध करावे.अतिरिक्त वाहनतळाची व्यवस्था करून मोफत वाहनतळाबाबत ठळक फलक लावावेत.
अन्न व औषध प्रशासनाने मठातील तसेच शहरातील हॉटेलमधील अन्नाची नियमित तपासणी करावी.शहरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य नियोजन करावे.

मंदिर समितीच्यावतीने भाविकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी यावेळी दिली.दर्शन रांगेत मॅट,बसण्याची सोय,पिण्याचे पाणी, शौचालये,विश्रांती कक्ष,बाथरूम,लाईव्ह दर्शनची सुविधा देण्यात येणार आहेत. तसेच भाविकांना मोफत चहा व खिचडी वाटप करण्यात येणार आहे.

महिला भाविकांसाठी चेंजिंग रूम, हिरकणी कक्ष, सॅनिटरी नॅपकीन सुविधा, तसेच चंद्रभागा वाळवंट परिसरात चेंजिंग रूम उभारण्यात येत आहे.भाविकांचे दर्शन सुलभ,सुरक्षित व जलद होईल यासाठी योग्य नियोजन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Back To Top