डेप्युटी कलेक्टर पवन मंगरुळे यांची द.ह. कवठेकर प्रशालेस सदिच्छा भेट : विद्यार्थ्यांना MPSC मार्गदर्शन
माजी विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी प्रवास: डेप्युटी कलेक्टर deputy collector पवन मंगरुळे pavan mangarule यांचा कवठेकर प्रशालेत सन्मान
एमपीएससी परीक्षेत यश मिळवून डेप्युटी कलेक्टर म्हणून नियुक्त झालेल्या पवन मंगरुळे यांनी आपल्या द. ह. कवठेकर प्रशालेस सदिच्छा भेट दिली. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
Pandharpur news:पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.21 जानेवारी 2026 – पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या द.ह.कवठेकर प्रशालेचे माजी विद्यार्थी तथा नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या परीक्षेत यश संपादन करून डेप्युटी कलेक्टर (प्रथम वर्ग अधिकारी) म्हणून नियुक्त झालेले पवन मंगरुळे यांनी आपल्या मातृशाळेला सदिच्छा भेट दिली.

पवन मंगरुळे यांनी सन 2013 मध्ये दहावीची परीक्षा द.ह.कवठेकर प्रशालेतून उत्तीर्ण केली.त्यानंतर त्यांनी अकलूज येथून बी.एस्सी.अॅग्री व पुढे राहुरी येथून एम.एस्सी. अॅग्री शिक्षण घेतले.पदव्युत्तर शिक्षण घेत असताना त्यांनी एमपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी केली. प्रारंभी त्यांची बालसंगोपन विभागात वर्ग दोन अधिकारी म्हणून नियुक्ती झाली तर त्यानंतरच्या परीक्षेत त्यांनी यश संपादन करून डेप्युटी कलेक्टर (वर्ग एक) पद प्राप्त केले.
पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण याच प्रशालेत झालेल्या पवन मंगरुळे यांनी यावेळी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी आपल्या सर्व विषय शिक्षकांची भेट घेऊन शाळेने दिलेले संस्कार,शिस्त व विविध उपक्रमांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
याप्रसंगी त्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन करताना आत्मविश्वास, सातत्यपूर्ण अभ्यास व स्वयंअध्ययनाचे महत्त्व अधोरेखित केले. घरची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असतानाही त्यांनी जिद्द व मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवले, असे त्यांनी सांगितले.

या प्रेरणादायी यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही.एम.कुलकर्णी यांनी डेप्युटी कलेक्टर पवन मंगरुळे यांचा सत्कार केला. संस्थेचे पदाधिकारी एस. पी.कुलकर्णी सर यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक एम.आर.मुंढे सर,पर्यवेक्षक आर.एस. कुलकर्णी सर,ज्येष्ठ शिक्षक प्रशांत मोरे सर,समीर दिवाण सर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

