रांचीतील झारखंड नवनिर्माण रॅलीत रामदास आठवले यांची गर्जना – NDA हाच झारखंडच्या विकासाचा मार्ग

रांचीतील झारखंड नवनिर्माण रॅलीत रामदास आठवले यांची गर्जना – NDA हाच झारखंडच्या विकासाचा मार्ग

झारखंडच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील NDA मध्ये यावे असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रांची येथे आयोजित झारखंड नवनिर्माण रॅलीत केले.

Ranchi RPI news : रांची / मुंबई | ज्ञानप्रवाह न्यूज,दि. 21 जानेवारी 2026 – झारखंड राज्याच्या जलद आणि सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) मध्ये सहभागी व्हावे, असे स्पष्ट आणि ठाम आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
रांची येथील जुन्या विधानसभेसमोरील मैदानात रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘झारखंड नवनिर्माण रॅली’ मध्ये ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी शेकडो रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

याच कार्यक्रमात रिपब्लिकन पक्षाच्या झारखंड राज्य शाखेच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.
शिव ऊराव यांची झारखंड राज्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.देवीदयाल मुंडा यांची राज्य सरचिटणीसपदी निवड जाहीर करण्यात आली.

यावेळी रिपब्लिकन पक्षाचे झारखंड प्रभारी चंदन शर्मा, राष्ट्रीय सचिव विजय प्रसाद गुप्ता, झारखंड महिला आघाडी अध्यक्षा पूनम सिंग, उपाध्यक्ष सीमा गुप्ता,आर.पी.सिंह, मुफ्ती अजहर कासमी,विवेक झा,आदिल अजगर, आरती बोहरा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

रामदास आठवले यांचे स्वागत रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी आदिवासी नृत्य, ढोल-झांज आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात मोठ्या उत्साहात केले. सभास्थळी उत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले.यावेळी बोलताना ना. आठवले म्हणाले, रिपब्लिकन पक्ष हा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष असून तो दलित, आदिवासी, बहुजन तसेच मुस्लिमांसह सर्व जाती-धर्मीयांच्या कल्याणासाठी काम करतो. झारखंडच्या गावागावात रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा पोहोचवण्याची वेळ आली आहे.

झारखंड हे नैसर्गिक संपत्तीने समृद्ध व आदिवासीबहुल राज्य असून येथे दलित-आदिवासींची एकजूट अधिक मजबूत करण्यासाठी रिपब्लिकन पक्ष प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. युवा नेतृत्वाच्या हाती पक्षाची धुरा देण्यात आली असून पुढील काळात तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर थेट भाष्य करताना ना. रामदास आठवले म्हणाले की, झारखंड सारख्या निसर्गरम्य आदिवासी बहुल राज्याच्या विकासासाठी हेमंत सोरेन यांनी नवा पर्याय स्वीकारला पाहिजे. त्यांनी राहुल गांधींची साथ सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील NDA मध्ये यावे,हाच झारखंडच्या विकासाचा खरा मार्ग आहे.

Leave a Reply

Back To Top