माघ यात्रेसाठी दिंडीधारकांनी भक्तीसागर येथे प्लॉट नोंदणी करावी – प्रांताधिकारी सचिन इथापे
पंढरपूर माघ यात्रा 2026: दिंडींसाठी भक्तीसागरात निवास व्यवस्था; 25 जानेवारीपासून प्लॉट नोंदणी
पंढरपूर माघ यात्रा 2026 निमित्त दिंडीधारकांसाठी भक्तीसागर (65 एकर) येथे निवासाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. 25 जानेवारीपासून प्लॉट नोंदणी सुरू होणार असून दिंडीधारकांनी प्लॉटची मागणी नोंदवावी, असे आवाहन प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे.
Pandharpur yatra news : पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२/०१/२०२६ – पंढरपूर येथे माघ यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा दि.२९ जानेवारी २०२६ रोजी साजरा होणार असून यात्रेचा कालावधी दि.२३ जानेवारी ते ०१ फेब्रुवारी २०२६ असा निश्चित करण्यात आला आहे. या यात्रेसाठी राज्यभरातून शेकडो दिंड्या पंढरपूरमध्ये दाखल होणार आहेत.

माघ यात्रेस येणाऱ्या दिंडीधारकांच्या वास्तव्यासाठी भक्तीसागर (65 एकर) परिसरात प्रशस्त जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.या ठिकाणी दिंड्यांना नियोजनबद्ध पद्धतीने प्लॉट वाटप करण्यात येणार असून दि.२५ जानेवारी पासून प्लॉट नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.दिंडीधारकांनी आपल्या दिंडीसाठी भक्तीसागर येथे प्लॉटची मागणी नोंदवावी,असे आवाहन प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे.
भाविकांच्या निवाऱ्यासाठी या ठिकाणी सर्व आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. भक्तीसागर परिसरात पिण्याचे शुद्ध पाणी,शौचालये, वीज कनेक्शन,अन्न शिजवण्यासाठी गॅस वितरण,पोलीस संरक्षण तसेच प्रथमोपचार केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे.
भाविकांच्या अडीअडचणी तात्काळ सोडवण्यासाठी आपत्कालीन मदत व प्रतिसाद केंद्रही कार्यरत राहणार आहे.
प्लॉट नोंदणी तसेच इतर सुविधांबाबत अधिक माहितीसाठी नायब तहसीलदार सुधाकर धाईंजे (मो. 9767248210) आणि ग्राम महसूल अधिकारी प्रमोद खंडागळे (मो. 9657290403) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

