पंढरपूरमध्ये 76 वा प्रजासत्ताक दिन थाटात होणार साजरा: तहसिलदार सचिन लंगुटेंनी घेतला तयारीचा आढावा

पंढरपूरमध्ये 76 वा प्रजासत्ताक दिन थाटात होणार साजरा : तहसिलदार सचिन लंगुटेंनी घेतला तयारीचा आढावा

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर तहसीलमध्ये नियोजन बैठक संपन्न

पंढरपूर येथे 26 जानेवारी 2026 रोजी साजऱ्या होणाऱ्या 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर तहसिलदार सचिन लंगुटे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनपूर्व आढावा बैठक संपन्न झाली.शासकीय ध्वजारोहण रेल्वे मैदानावर होणार आहे.

Pandharpur news: पंढरपूर lज्ञानप्रवाह न्यूज : भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 76 वा वर्धापन दिन सोमवार दि.26 जानेवारी 2026 रोजी साजरा करण्यात येणार असून यानिमित्त शासकीय ध्वजारोहण समारंभ रेल्वे मैदान पंढरपूर येथे आयोजित करण्यात येणार आहे. या समारंभाच्या पूर्वतयारीसाठी तहसील कार्यालय पंढरपूर येथे नियोजनपूर्व आढावा बैठक घेण्यात आली.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी तहसिलदार सचिन लंगुटे होते.यावेळी मुख्याधिकारी महेश रोकडे, नायब तहसिलदार बालाजी पुदलवाड, विविध शासकीय विभागांचे अधिकारी तसेच पंढरपूर शहरातील विविध शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

बैठकीत तहसिलदार सचिन लंगुटे यांनी प्रत्येक विभागाला देण्यात आलेल्या जबाबदाऱ्या वेळेत व काटेकोरपणे पार पाडण्याच्या सूचना दिल्या.सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपालिका प्रशासनाने रेल्वे मैदानाची स्वच्छता करून दगड-खडी काढणे,पाणी टाकून रोलिंग करणे तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्याची व अग्निशमन यंत्रणेची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.

आरोग्य विभागाने वैद्यकीय पथकासह सुसज्ज रुग्णवाहिका, प्रथमोपचार सुविधा उपलब्ध ठेवाव्यात,असेही स्पष्ट करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांसाठी बैठक व्यवस्था, विद्युत व्यवस्था, ध्वनी प्रणाली आदी बाबी संबंधित विभागांनी वेळेत पूर्ण कराव्यात,असे निर्देश तहसिलदार लंगुटे यांनी दिले.

प्रजासत्ताक दिनाचा समारंभ शिस्तबद्ध, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय साधून काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

Leave a Reply

Back To Top