डॉ.सुप्रिया साळुंखे-कदम जगविख्यात होतील; विजय मंगल हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी सादिक खाटीक यांचे गौरवोद्गार
वैद्यकीय व साहित्य क्षेत्रात डॉ.सुप्रिया साळुंखे-कदम यांचे मोलाचे कार्य:
आटपाडी येथे विजय मंगल हॉस्पिटल’च्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष सादिक खाटीक यांनी डॉ.सुप्रिया साळुंखे-कदम यांच्या वैद्यकीय, साहित्यिक व समाजसेवेचे कौतुक करत त्या जगविख्यात होतील,असा विश्वास व्यक्त केला
आटपाडी | दि.२०,ज्ञानप्रवाह न्यूज : वैद्यकीय सेवा, साहित्य सेवा आणि चौफेर समाजाभिमुख कार्याच्या जोरावर डॉ. सुप्रिया साळुंखे-कदम या माणदेशी रत्न ठरतीलच, शिवाय आपल्या प्रचंड कार्यकर्तृत्वामुळे त्या भविष्यात जगविख्यात होतील, असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष सादिक खाटीक यांनी काढले.

आटपाडी पोस्ट ऑफिससमोर डॉ. सुप्रिया साळुंखे-कदम यांनी सुरू केलेल्या विजय मंगल हॉस्पिटल च्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर शुभेच्छा देताना सादिक खाटीक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी डॉ. श्रीप्रसाद कदम व डॉ. सुप्रिया साळुंखे-कदम या दाम्पत्याचा सत्कार सादिक खाटीक, सौ. राबीयाँबसरी खाटीक व कु. अलशिफा कलाल यांच्या हस्ते करण्यात आला.
आटपाडी शहर व तालुक्याला वैद्यकीय सेवेची गौरवशाली परंपरा असून १९५० च्या दशकात डॉ. जगन्नाथ बापट व डॉ. शामराव चव्हाण यांनी ईश्वरसेवा समजून रुग्णसेवा केली. सर्वसामान्य माणूस हा त्यांच्या सेवाकेंद्राचा आत्मा होता. पैशापेक्षा आरोग्यसेवा श्रेष्ठ मानणाऱ्या या थोर डॉक्टरांचा दैदीप्यमान वारसा कदम दाम्पत्य पुढे चालवेल,असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
डॉ. श्रीप्रसाद कदम हे लोकाभिमुख व निष्णात नेत्रतज्ज्ञ असून डॉ. सुप्रिया साळुंखे-कदम या संवेदनशील व प्रतिभावान कवयित्री आहेत. नुकतेच सातारा येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांनी सादर केलेल्या लक्षवेधी व मर्मभेदी कवितांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधले. भविष्यात त्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचतील, इतकी साहित्यिक प्रगल्भता त्यांच्यात आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

डॉ. सुप्रिया यांनी आपल्या पिताश्री विजयराव साळुंखे व मातोश्री सौ. मंगलमाई साळुंखे यांच्या नावाने ‘विजय मंगल हॉस्पिटल’ सुरू करून कृतिशील मातृ-पितृभक्तीचा आदर्श घालून दिला आहे. याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
आपल्या वैद्यकीय, साहित्यिक व सामाजिक सेवेच्या जोरावर डॉ. सुप्रिया साळुंखे-कदम या नक्कीच जगविख्यात होतील, अशा मनःपूर्वक शुभेच्छा सादिक खाटीक यांनी यावेळी दिल्या.

