माघ यात्रेसाठी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर प्रशासन सज्ज:३ ते ४ लाख भाविकांसाठी जय्यत तयारी – गहिनीनाथ महाराज औसेकर
माघ यात्रेसाठी मंदिर समितीची भव्य तयारी; 1200 कर्मचारी व स्वयंसेवक तैनात

माघ एकादशीनिमित्त पंढरपूर येथे माघ यात्रेसाठी मंदिर प्रशासन सज्ज असून ३ ते ४ लाख भाविकांसाठी सुलभ दर्शन व सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
Pandharpur maghi yatra news: पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.२७ जानेवारी:माघ शुद्ध एकादशी अर्थात जया एकादशी निमित्त दरवर्षी भरणाऱ्या माघ यात्रेसाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर प्रशासन सज्ज झाले आहे. यंदा माघी यात्रा गुरुवार, दि. २९ जानेवारी रोजी होत असून या कालावधीत सुमारे ३ ते ४ लाख भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पंढरपुरात येण्याची अपेक्षा आहे. भाविकांना सुलभ, जलद दर्शनासह आवश्यक सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराशी संबंधित परंपरांचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे.नवमीला श्री. ह.भ.प.वासकर महाराज यांची दिंडी,द्वादशीला ह.भ.प. आजरेकर महाराज पंढरपूर यांचा नैवेद्य तर त्रयोदशीला श्री. ह.भ.प. औसेकर महाराज यांचे चक्रीभजन होणार आहे. एकादशीला पहाटे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची नित्यपूजा मंदिर समितीमार्फत संपन्न होणार आहे.
आपत्कालीन व्यवस्थेसाठी सोलापूर महानगरपालिकेची रेस्क्यू व्हॅन,प्रशिक्षित कर्मचारी,सिझफायर यंत्रणा, अत्याधुनिक १०० सीसीटीव्ही कॅमेरे व स्वतंत्र कंट्रोल रूम, वायरलेस यंत्रणा, जनरेटर, मेटल डिटेक्टर, मोबाईल लॉकर,चप्पल स्टँड, सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली,चौकशी कक्ष,बॅग स्कॅनर मशीन,अपघात विमा पॉलिसी आदी सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
आरोग्य व्यवस्थेसाठी पत्राशेड येथे तालुका आरोग्य विभागाचा वैद्यकीय कक्ष,दर्शन मंडपात उपजिल्हा रुग्णालया मार्फत आयसीयू तसेच वैष्णव चॅरीटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्या वतीने मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मंदिर परिसरात वैद्यकीय पथकासह दोन अद्यावत रुग्णवाहिका तैनात राहणार आहेत.

स्वच्छतेसाठी मंदिर,दर्शन मंडप ,तुकाराम भवन परिसरातील स्वच्छता मंदिर कर्मचाऱ्यांमार्फत तर नगरप्रदक्षिणा, दर्शन रांग व प्रदक्षिणा मार्गावरील स्वच्छता आउटसोर्सिंग पद्धतीने करण्यात येत आहे.या कामासाठी स्वकाम सेवा आळंदी व संत ज्ञानेश्वर सेवा मंडळ आळंदी या स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेण्यात आले आहे.
दर्शन रांग व्यवस्थापनासाठी स्कायवॉक पासून पत्राशेडपर्यंत बॅरिकेटिंग करून ताडपत्री लावण्यात आली असून, कायमस्वरूपी चार व तात्पुरते चार असे एकूण आठ पत्राशेड उभारण्यात आले आहेत.दर्शन रांगेत मॅट,बसण्याची सुविधा, थंड पिण्याचे पाणी,तात्पुरते उड्डाणपूल,शौचालये, विश्रांती कक्ष, बाथरूम व लाईव्ह दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
महिला भाविकांसाठी सॅनिटरी नॅपकीन, हिरकणी कक्षाची सुविधा उपलब्ध असून, श्रींचा प्रसाद म्हणून बुंदी व राजगिरा लाडू देण्यात येणार आहे.तसेच वेदांता, व्हीडिओकॉन व श्री विठ्ठल-रुक्मिणी या तीन भक्तनिवासांतील ३६१ खोल्यांमध्ये सुमारे १६०० भाविकांची निवास व्यवस्था करण्यात आली आहे.

सुलभ व जलद दर्शनासाठी अनुभवी कमांडोजची नियुक्ती करण्यात आली असून, व्हीआयपी दर्शनावर निर्बंध घालण्यात आले आहेत. दर्शनाची वेळ सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही माघ यात्रा सुरळीत व निर्विघ्न पार पाडण्यासाठी १२०० कर्मचारी व स्वयंसेवक कार्यरत राहणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

