नांदेडमध्ये १२०० रुपयांची लाच महागात: मुख्याध्यापिकेसह दोन शिक्षक ACB च्या जाळ्यात अडकले

नांदेडमध्ये १२०० रुपयांची लाच महागात: मुख्याध्यापिकेसह दोन शिक्षक ACB च्या जाळ्यात अडकले

नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात आयकर रिटर्नसाठी पगार विवरणपत्र देण्यासाठी १२०० रुपयांची लाच घेताना जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिके सह दोन शिक्षकांना ACB ने रंगेहाथ अटक केली.

Nanded crime news:नांदेड/ ज्ञानप्रवाह न्यूज: नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील उस्माननगर येथील जिल्हा परिषद शाळेत लाचखोरीचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. आयकर रिटर्न भरण्यासाठी आवश्यक असलेले पगाराचे विवरणपत्र (Salary Statement) देण्यासाठी प्रत्येकी ६०० रुपये याप्रमाणे एकूण १२०० रुपयांची लाच मागून स्वीकारताना मुख्याध्यापिकेसह दोन सहशिक्षकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ अटक केली आहे.

ही कारवाई २९ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आली. या प्रकरणी उस्माननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अटक करण्यात आलेल्यांमध्ये मुख्याध्यापिका विद्या बळवंत वांगे वय ५५ , सहशिक्षक रामेश्वर शामराव पांडागळे वय ५६ आणि सहशिक्षक गौतम जयवंतराव सोनकांबळे वय ५६ यांचा समावेश आहे. हे तिघेही उस्माननगर जिल्हा परिषद शाळेत कार्यरत होते.

तक्रारदार दांपत्याने सन २०१९ ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत संबंधित शाळेत शिक्षक व शिक्षिका म्हणून सेवा बजावली होती. सप्टेंबर २०२५ मध्ये त्यांची बदली झाल्यानंतर आयकर रिटर्न भरण्यासाठी त्यांना सन २०२५ चे पगाराचे विवरणपत्र आवश्यक होते.यासाठी त्यांनी २६ जानेवारी २०२६ रोजी मुख्याध्यापिकेकडे मागणी केली असता प्रत्येकी ६०० रुपये लाच मागितल्याचा आरोप आहे.

तक्रार प्राप्त होताच ACB ने पडताळणी केली असता लाच मागणी सत्य असल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर २९ जानेवारी रोजी सापळा रचण्यात आला. तक्रारदाराने सहशिक्षक रामेश्वर पांडागळे याच्याकडे १२०० रुपये दिले.ही रक्कम स्वतःसाठी तसेच मुख्याध्यापिका विद्या वांगे यांच्यासाठी स्वीकारताना पांडागळे यांना रंगेहाथ पकडण्यात आले तसेच सहशिक्षक गौतम सोनकांबळे यांनी लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचे तपासात समोर आल्याने त्यांनाही अटक करण्यात आली.

या घटनेमुळे जिल्हा परिषद शाळांमधील प्रशासकीय कामकाजात पारदर्शकतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, लाचलुचपत रोखण्यासाठी कठोर उपाययोजनांची गरज अधोरेखित झाली आहे.

Leave a Reply

Back To Top