National Geographic India छायाचित्रण स्पर्धेत राहुल गोडसे टॉप थ्रीमध्ये : मंदिर समितीकडून सन्मान

National Geographic India छायाचित्रण स्पर्धेत राहुल गोडसे टॉप थ्रीमध्ये; मंदिर समितीकडून सन्मान

National Geographic India Photography Contest मध्ये राहुल गोडसे यांनी टॉप थ्रीमध्ये स्थान पटकावले. मंदिर समितीकडून त्यांचा सन्मान करण्यात आला.

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३१ : राष्ट्रीय पातळीवरील अत्यंत प्रतिष्ठेच्या National Geographic India Photography Contest – #CaptureInMotion या स्पर्धेत टॉप तीन विजेत्यांमध्ये स्थान मिळवून छायाचित्रकार राहुल गोडसे यांनी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्याचा नावलौकिक वाढवला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते त्यांचा गौरव व सन्मान करण्यात आला.

या स्पर्धेसाठी राहुल गोडसे यांनी हुलजंती ता.मंगळवेढा येथे भरलेल्या यात्रेतील छायाचित्रे सादर केली होती.यात्रेतील भाविकांचे भावविश्व,श्रद्धा,लोकजीवन, हालचाल आणि क्षणांचे जिवंत दर्शन त्यांच्या छायाचित्रांतून प्रभावीपणे साकार झाले असून याच वैशिष्ट्यांमुळे परीक्षकांचे विशेष लक्ष वेधले गेले.

National Geographic India सारख्या जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित संस्थेने त्यांच्या छायाचित्रण कलेची दखल घेत सन्मानचिन्ह,स्टोरी बॉक्स तसेच विजेत्यांचे छायाचित्र पुस्तक प्रदान केले. हा सन्मान केवळ एका छायाचित्रापुरता मर्यादित नसून त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीचा, कलात्मक दृष्टीकोनाचा आणि दीर्घ छायाचित्रण प्रवासाचा गौरव असल्याचे ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी यावेळी नमूद केले.

उल्लेखनीय बाब म्हणजे राहुल गोडसे हे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमध्ये कंत्राटी छायाचित्रकार म्हणून कार्यरत आहेत.मंदिर समितीच्या माध्यमातून मिळालेल्या व्यासपीठामुळे त्यांच्या कलेला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.

आतापर्यंत गोडसे यांना विविध नामवंत संस्थांकडून १० ते १२ पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सन २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात त्यांच्या छायाचित्राचा विशेष उल्लेख केला होता.महाराष्ट्र शासना कडूनही त्यांना यापूर्वी दोन वेळा सन्मानित करण्यात आले आहे.

या सन्मानप्रसंगी सल्लागार परिषद सदस्य ह.भ.प.चैतन्य महाराज देगलूरकर,ह.भ.प. चंद्रशेखर महाराज देगलूरकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके,व्यवस्थापक संदेश भोसले,लेखाधिकारी मुकेश अनेचा, विभागप्रमुख पृथ्वीराज राऊत,राजेंद्र सुभेदार,संजय कोकिळ,राजेश पिटले आदी उपस्थित होते.सर्वांनी गोडसे यांच्या यशाबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Back To Top