…आणि राज्यपालांनी भर परिषदेत गाऊन काढून टाकला विज्ञान, गुलामगिरीची मानसिकता आणि आजही प्रासंगिक संदेश – उमेश काशीकर यांचे मनोगत

…आणि राज्यपालांनी भर परिषदेत गाऊन काढून टाकला! विज्ञान,गुलामगिरीची मानसिकता आणि आजही प्रासंगिक संदेश – उमेश काशीकर यांचे मनोगत

१९९३ चा तो क्षण: विज्ञान परिषदेत राज्यपाल सी. सुब्रमण्यम यांनी मोडली रूढींची साखळी

१९९३ मध्ये गोव्यातील राष्ट्रीय विज्ञान परिषदेत राज्यपाल सी. सुब्रमण्यम यांनी गाऊन काढून टाकत विज्ञानातील अंधानुकरणावर प्रहार केला. विज्ञान, नवोन्मेष आणि स्वातंत्र्याचा आजही प्रासंगिक संदेश.

जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार मुंबई, व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांनी परिषदेचे उदघाटन केले. उदघाटन सत्रानंतर पुढील सत्राच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे राज्यपाल व हरित क्रांतीचे जनक सी सुब्रमण्यम होते.

या सत्रात घडलेला किस्सा सी सुब्रमण्यम यांनी आपले जीवन चरित्र हॅन्ड ऑफ डेस्टिनी (खंड ३) मध्ये नमूद केला आहे. तो त्यांच्याच शब्दात :

पंतप्रधानांच्या उद्घाटन सत्रातील भाषणानंतर माझी बोलण्याची वेळ आली. वैज्ञानिकांनी प्रगतीच्या नवनव्या क्षितिजांवर काम करायला हवे. आपले वैज्ञानिक मात्र अजूनही शिष्टाचार आणि रूढींच्या बंधनात अडकलेले आहेत हे पाहून मला मनापासून राग आला होता.

आपल्या भाषणात त्यांना स्पष्ट शब्दात सुनावले की आपण घातलेला काळ्या रंगाचा गाऊन एक तर दिसायला बेढब आहे आणि दुसरे म्हणजे तो आपल्या देशातील हवामानाशी पूर्णतः विसंगत आहे. असे गाऊन घालणे हे गुलामगिरीच्या मानसिकतेतून पाश्चात्यांचे अंधानुकरण करण्यासारखे आहे.

संशोधन व नवोन्मेषाची जबाबदारी असलेल्या शास्त्रज्ञांनी असे अंधानुकरण करू नये.

या बदलाची सुरुवात म्हणजे आपण परिधान केलेला हा गाऊन काढून फेकणे, असे मी म्हणालो आणि लगेचच थोड्या नाट्यमय पद्धतीने स्वतःचा गाऊन अंगावरून काढून बाजूला टाकला.

विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री रंगराजन कुमारमंगलम यांनी देखील लगेचच माझ्या या कृतीचे अनुकरण केले; त्यानंतर उपस्थित अनेक शास्त्रज्ञांनीही आपापले गाऊन काढून टाकले.

देशातील पहिली राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान समिती स्थापन करणारा आणि तसेच पहिला राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान आराखडा तयार करून प्रत्यक्ष अंमलात आणणारा म्हणून प्राप्त झालेल्या पालकत्वाच्या नात्याने मी शास्त्रज्ञांना सल्ला दिला की त्यांनी व्यर्थ वेळ दवडणारे समारंभ टाळावे आणि गांभीर्यपूर्वक आपल्या संशोधनाच्या कामाला लागावे.

देशातील विज्ञान संस्थांवर असलेले नोकरशाहीचे नियंत्रण तसेच विज्ञानाला ‘हस्तिदंती मनोऱ्यांमधून’ खाली उतरवून ते तळागाळापर्यंत पोहोचवणे यांसारख्या विषयांवर अश्या विज्ञान परिषदांमध्ये चर्चा झाल्या पाहिजे.

विज्ञानाच्या माध्यमातून देशापुढील अनेक आव्हानांना तोंड देता येऊ शकते. त्यांवर लक्ष केंद्रित करुन वैज्ञानिकांनी दिखाऊ प्रथा परंपरांच्या जोखडातून बाहेर आले पाहिजे हा राज्यपाल सी सुब्रमण्यम यांचा संदेश आजही प्रासंगिक आहे.

याच सत्रानंतर सुब्रमण्यम यांनी वैज्ञानिकांशी अनौपचारिक गप्पा मारताना पंतप्रधान नरसिंह राव यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. ती टीका वृत्तपत्रात बातमीच्या रुपात प्रसिद्ध झाल्यावर सुब्रमण्यम यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा दिला होता.

Leave a Reply

Back To Top