पुरोगामी नेतृत्वाला अभिवादन : कर्मवीर महाविद्यालयात अजित पवार यांना श्रद्धांजली
पंढरपूर : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य अजित पवार यांच्या अकाली निधनाने रयत शिक्षण संस्थेसह संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.विविध मान्यवर, प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ही शोकसभा पार पडली.

Pandhapur news: पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज: रयत शिक्षण संस्थेच्या पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे महाविद्यालया च्या बॅरिस्टर पी.जी.पाटील सभागृहात भावपूर्ण श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या शोकसभेस रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य बाळासाहेब पाटील, डॉ.राजेंद्र जाधव,जी.बी.भायगुडे,यशवंत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता साळवे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.भगवान नाईकनवरे, डॉ. सुशीलकुमार शिंदे, डॉ. राजेश कवडे, अधिष्ठाते डॉ. समाधान माने, डॉ.अनिल चोपडे,आयक्यूएसी समन्वयक डॉ.अमर कांबळे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य विठ्ठल काटकर यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शोकसभेचे प्रास्ताविक पदव्युत्तर पदवी विभागाचे अधिष्ठाता डॉ.बाळासाहेब बळवंत यांनी केले. यावेळी मान्यवरांनी अजितदादा पवार यांच्या स्पष्टवक्तेपणा, निर्णयक्षमता, तत्परता व संवेदनशील नेतृत्वगुणांचा गौरव केला.फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेणारे नेतृत्व म्हणून त्यांनी सामाजिक व आर्थिक क्षेत्रात घेतलेले धाडसी निर्णय स्मरणात ठेवले गेले.
रयत शिक्षण संस्थेच्या विकासासाठी अजित पवार यांनी दिलेले योगदान मोलाचे असून विद्यार्थीहिताचे उपक्रम, रयत विज्ञान परिषदेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उभारणीचा संकल्प व तात्काळ मदतीची घोषणा यांचा उल्लेख मान्यवरांनी केला.१९९६ पासून विविध समित्यांमध्ये त्यांनी कार्यकर्ता, मार्गदर्शक व नेता म्हणून बजावलेली भूमिका उल्लेखनीय असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.टी.जाधव यांनी अजित पवार हे अभ्यासू, कार्यक्षम व जनसामान्यांशी नाते जपणारे नेतृत्व होते, असे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सारिका भांगे यांनी केले. आभार समारंभ समितीचे अध्यक्ष प्रा.डॉ.दत्ता डांगे यांनी मानले.
या शोकसभेस महाविद्यालयातील वरिष्ठ- कनिष्ठ, व्होकेशनल विभागातील कर्मचारी तसेच रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाखांमधील सेवानिवृत्त शिक्षक व रयतप्रेमी नागरिक उपस्थित होते.






