श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील परिवार देवतांच्या मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा भक्तिभावात संपन्न

पंढरपुरात 10 परिवार देवतांच्या मूर्तींची विधिवत प्राणप्रतिष्ठा:भाविकांसाठी मंदिरे खुली

पुरातत्व विभागाच्या जतन कार्यानंतर श्री विठ्ठल मंदिरातील परिवार देवतांची प्राणप्रतिष्ठा

पंढरपूर : श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिर व परिसरातील परिवार देवता मंदिरांचे जतन व संवर्धन कार्य पूर्ण झाल्यानंतर दहा मंदिरांमधील परिवार देवतांच्या मूर्तींची विधिवत प्राणप्रतिष्ठा 6 फेब्रुवारी रोजी भक्तिभावात पार पडली.पुरातत्व विभागा मार्फत शासन निधीतून हे काम करण्यात आले.4 ते 6 फेब्रुवारी दरम्यान 21 ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत शास्त्रोक्त पद्धतीने प्राणप्रतिष्ठा,होमहवन व धार्मिक विधी पार पडले. या प्राणप्रतिष्ठेनंतर संबंधित मंदिरे भाविकांच्या दर्शनासाठी खुली करण्यात आली.

Pandhapur Mandir news:पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज, दि.06 : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व मंदिर परिसरातील परिवार देवता मंदिरांचे जतन व संवर्धन कार्य पुरातत्व विभागामार्फत शासन निधीतून सुरू आहे. या अंतर्गत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील एकूण 36 परिवार देवतांपैकी काही मंदिरांचे काम पूर्णत्वास आले असून, त्यापैकी 10 मंदिरांमधील परिवार देवतांच्या मूर्तींची विधिवत प्राणप्रतिष्ठा शुक्रवार दि.6 फेब्रुवारी रोजी भक्तिभावात संपन्न झाली.

दक्षिणमुखी गणपती मंदिर, गरुड हनुमंत, श्री रामेश्वर मंदिरावरील शाळुंखा या परिवार देवतांच्या मूर्ती नव्याने यज्ञ करून स्थापित करण्यात आल्या.तसेच महा नैवेद्य दरवाज्याशेजारील शाकंबरी, काशीविश्वेश्वर शेजारील गणपती,काशी विश्वेश्वर, काशी विश्वेश्वर समोरील नंदी, रामेश्वर, रामेश्वर समोरील नंदी, लक्ष चौऱ्याऐंशी देवी आदी परिवार देवतांच्या मूर्तींची पुनः प्राणप्रतिष्ठा शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आली.हा प्राणप्रतिष्ठा सोहळा दि.4 ते 6 फेब्रुवारी या कालावधीत श्री विठ्ठल सभा मंडप येथे 21 ब्रह्मवृंदांच्या माध्यमातून पार पडला.

यावेळी मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य शकुंतलाताई नडगिरे,ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर,कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, लेखाधिकारी मुकेश अनेचा, विभाग प्रमुख संजय कोकीळ, अतुल बक्षी,सहाय्यक विभाग प्रमुख संदीप कुलकर्णी व प्रसाद दशपुत्रे आदी उपस्थित होते.

या दहा परिवार देवता मंदिरांचे जतन व संवर्धन कार्य पूर्ण झाल्यानंतर संबंधित मूर्तींची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली असून ही मंदिरे आता भाविकांच्या दर्शनासाठी खुली करण्यात आल्याची माहिती मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती,पंढरपूर अंतर्गत मंदिराच्या मुख्य वास्तूसह परिसरातील व बाहेरील परिवार देवता भागांमध्ये जतन, दुरुस्ती व संवर्धन कार्य टप्प्याटप्प्याने सुरू आहे.धार्मिक शास्त्र, परंपरा व रीतिरिवाजांनुसार प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतरच पूजनास प्रारंभ केला जातो. त्या अनुषंगाने तीन दिवस चाललेल्या या धार्मिक विधींमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.

Leave a Reply

Back To Top