आनंदयात्री तून पुणेकर रसिक पुलकित
पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचतर्फे आयोजन
पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज : तुझे आहे तुजपाशी नाटकातील प्रवेश, ती फुलराणी तील स्वगत, अंतू बरवा या व्यक्तिरेखेसह विविध किश्श्यांनी पुणेकर रसिकांची सायंकाळी पुलकित झाली.
निमित्त होते पूना गेस्ट हाऊस स्नेह मंच आयोजित आनंदयात्री या विशेष कार्यक्रमाचे पूना गेस्ट हाऊस येथे सोमवारी दि.१४ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल.देशपाडे अर्थात पुलंच्या विपुल साहित्यातील उत्कंठावर्धक किस्से आणि पैलू उलगडून दाखविणाऱ्या कार्यक्रमास रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.

कलाकारांनी आत्मियतेने केलेले सादरीकरण आणि त्यास रसिकांनी भरभरून दिलेली दाद यातून कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.स्वरयोग निर्मित कार्यक्रमाची संकल्पना प्रदीप देसाई यांची होती तर निर्मिती सहाय्य सुबोध चितळे यांचे होते.प्रदीप देसाई यांनी पुलंविषयीच्या अनेक आठवणी आणि किस्से सांगत कार्यक्रमातील रंगत वाढविली.पुलंचे रंगमंचावर झालेले आगमन,आकाशवाणी, दूरदर्शनमध्ये केलेली नोकरी, व्यक्ती म्हणून, संगीतकार म्हणून अनुभवलेले पुलं असे अनेक किस्से त्यांनी सांगितले.
प्रसिद्ध एकपात्री कलाकार सुबोध चितळे, केतकी पांडे, नाट्यकर्मी राजीव कुलकर्णी, मंजुषा जोशी या कलाकारांनी सुरुवातीस तुझे आहे तुजपाशी नाटकातील प्रवेश सादर केला. असा मी असामी हा एकपात्री प्रवेश, ‘ती फुलराणी’ या नाटकातील स्वगत रसिकांना विशेष भावले.संजय मरळ आणि वैजू चांदवडे यांनी गीते सादर केली. सुनीताबाई देशपांडे यांनी लिहिलेल्या पत्रांचे वाचन हा एक अनोखा अनुभव ठरला.
पूना गेस्ट हाऊसचे संचालक किशोर सरपोतदार यांनी स्नेह मंचतर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.त्याप्रमाणे पु.ल.देशपांडे यांच्या विषयीच्या आठवणीही सांगितल्या.प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, आनंद सराफ, ममता सपकाळ, बंडा जोशी, मकरंद टिल्लू यांच्यासह सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते. कलाकारांचा सत्कार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आला.या कार्यक्रमाचे संयोजन अजित कुमठेकर यांनी केले.