वाढदिवस माणुसकीचा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जे.जे. रुग्णालयात नवमाता व बालकांना वस्त्रदान
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील जे.जे. रुग्णालयात डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते नवमाता व नवजात बालकांना वस्त्रदान व १००० रुग्णांना अन्नदानाचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
Mumbai news : मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०८/०२/ २०२६ :महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस म्हणजे केवळ राजकीय कार्यक्रम नव्हे तर सेवाभाव,माणुसकी आणि सामाजिक बांधिलकीचा उत्सव असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुंबईतील सर जे.जे.रुग्णालयात नवमाता व नवजात बालकांसाठी वस्त्रदानाचा हृदयस्पर्शी उपक्रम पार पडला.
हा उपक्रम विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते संपन्न झाला. प्रसूतीनंतर सावरत असलेल्या मातांसाठी व या जगात पहिले पाऊल टाकणाऱ्या चिमुकल्या बालकांसाठी हे वस्त्रदान मायेची ऊब देणारे ठरले.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी नवमातांशी आपुलकीने संवाद साधत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली व बालकांना प्रेमपूर्वक वस्त्रे अर्पण केली. अनेक मातांच्या डोळ्यांत समाधानाचे अश्रू तर ओठांवर कृतज्ञतेचे शब्द उमटले.
या उपक्रमादरम्यान डॉ.नीलम गोऱ्हे यांनी जे.जे.रुग्णालया तील सोयी-सुविधांचा सखोल आढावा घेतला.रुग्णालय प्रशासनाने मांडलेल्या विविध प्रस्तावांवर शासन स्तरावर सकारात्मक पाठपुरावा केला जाईल तसेच आगामी अधिवेशनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. रुग्णालया तील वॉर्ड्सच्या नूतनीकरणासाठीही स्वतः विशेष प्रयत्न करणार असल्याचे डॉ.गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

मुंबईतील या उपक्रमानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे येथेही अशाच प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शहर संघटक आनंद गोयल यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास शिवसेना उपनेत्या कला शिंदे,दिलीप नाईक, जितेंद्र सपकाळ, संपर्कप्रमुख वर्षा मोरे,महिला विभाग प्रमुख नीलम पवार,रेखा सुरणकर,पुणे शहर संघटक आनंद गोयल, अल्का माने, सामाजिक कार्यकर्त्या डॉ.वैशाली वाढे, संतोष सावंत,जन्नत परवीन यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमास जे.जे.रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ.संजय सुरासे, डॉ. विजय कल्याणकर,डॉ.सोनाली देशमुख, डॉ.अरुण राठोड,डॉ.मयुरी वावधने,डॉ.अर्चना पाटील,चित्रा सेलवराज,नितीन कोलंबकर यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
विशेष बाब म्हणजे, जे.जे.रुग्णालयातील जवळपास १,००० निवासी रुग्णांना अन्नदान करण्यात आले.माणुसकीच्या स्पर्शाने उजळलेला हा वाढदिवस अनेकांच्या आयुष्यात आशेचा आणि उत्साहाचा किरण ठरला असून, सर्व स्तरांतून उपमुख्यमंत्र्यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.






