प्रामाणिकपणाला विठ्ठलाचा आशीर्वाद : पंढरपूर महावस्त्र विभागाने परत केले 10 हजार रुपये : भाविक भारावले

प्रामाणिकपणाला विठ्ठलाचा आशीर्वाद : पंढरपूर महावस्त्र विभागाने परत केले 10 हजार रुपये : भाविक भारावले

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरा तील महावस्त्र विभागाने चुकून जादा घेतलेले 10 हजार रुपये भाविकांना तत्परतेने परत केले. कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक.

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१० : श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील महावस्त्र विभागातील कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि पारदर्शकतेमुळे भाविकांमध्ये समाधान पसरले असून विश्वास अधिक दृढ झाला आहे. ही घटना समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

कोलकता (पश्चिम बंगाल) येथील भाविक आशिष भिमनवार हे ६ फेब्रुवारी रोजी पत्नी डॉ.रुपाली भिमनवार यांच्यासह विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे आले होते. दर्शनानंतर त्यांनी महावस्त्र दालनातून माता रुक्मिणीची साडी व पांडुरंग पूजेचे वस्त्र आशीर्वाद रूपाने खरेदी केले. बिलानुसार संपूर्ण रक्कम अदा करून ते परतले.

मात्र तीन दिवसांनंतर महावस्त्र विभागातील कर्मचाऱ्यांनी स्वतःहून संपर्क साधत खरेदीदरम्यान चुकून ₹10,000 जादा रक्कम जमा झाल्याची माहिती दिली.संबंधित कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे अवघ्या दहा मिनिटांत ही रक्कम भाविकांना परत करण्यात आली. आजच्या काळात सरकारी संस्थांमध्येही अशी सचोटी आणि निस्वार्थ सेवाभाव पाहून भाविकांनी समाधान व्यक्त केले. मंदिर समितीच्या कार्यपद्धतीबद्दल अभिमान व्यक्त करत त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांचा सन्मान व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

या प्रकरणात श्रीमती मनीषा ताई जायकर यांची जबाबदारी व प्रामाणिकता विशेष उल्लेखनीय ठरली.त्यांच्यासह एकनाथ दर्शने,इंदू रणदिवे,स्नेहा वाडेकर,सपना सोनार व स्नेहल वाघमारे यांनीही कर्तव्यनिष्ठा दाखवली.

मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके,व्यवस्थापक संदेश भोसले व विभाग प्रमुख अतुल बक्षी यांनी संबंधित कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

भाविक आशिष भिमनवार यांनी कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ प्रशस्तीपत्र व छोटेखानी सन्मान सोहळा आयोजित करावा, अशी मागणी मंदिर समितीकडे ई-मेलद्वारे केली असून कुटुंबीयांच्यावतीने रोख पारितोषिक देण्याची इच्छाही व्यक्त केली आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील महावस्त्रे श्री संत तुकाराम भवन व श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप येथे अल्प देणगी मूल्यावर उपलब्ध करून देण्यात येतात.विभाग प्रमुख अतुल बक्षी व सहाय्यक विभाग प्रमुख मनीषा जायकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा विभाग कार्यरत असून भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.विठ्ठल विठ्ठल या नामस्मरणाला अर्थ देणारी ही घटना समाजासाठी आदर्शवत ठरत आहे.

Leave a Reply

Back To Top