मंगळवेढा भूमीअभिलेख कार्यालयातील कामचुकार कर्मचाऱ्यावर कारवाईची सुरुवात; कारणे दाखवा नोटीस बजावली

मंगळवेढा भूमीअभिलेख कार्यालयातील कामचुकार कर्मचाऱ्याला कारणे दाखवा नोटीस

मंगळवेढा भूमीअभिलेख कार्यालयातील कामचुकार कर्मचाऱ्यावर कारवाईची सुरुवात; कारणे दाखवा नोटीस बजावली

प्रलंबित कामे,विनापरवानगी अनुपस्थिती आणि नियमभंगाचा आरोप; पुढील कारवाईकडे शेतकरी-नागरिकांचे लक्ष

Mangalwedha news:मंगळवेढा | ज्ञानप्रवाह न्यूज – मंगळवेढा येथील भूमीअभिलेख कार्यालयातील एका कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे शेतकरी आणि नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अखेर प्रशासनाने कारवाईची पावले उचलली आहेत. परिक्षण भूमापक जफारउल्ला तांबोळी यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी भूमी उपअधिक्षक विद्या तांगडे यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागविला आहे. या कारवाईमुळे कार्यालयातील इतर कामचुकार कर्मचाऱ्यांमध्येही मोठी खळबळ उडाली आहे.

मंगळवेढा येथील भूमीअभिलेख कार्यालयात तांबोळी यांच्याकडे मोठ्या प्रमाणात प्रकरणे प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. याबाबत अनेक शेतकरी आणि नागरिकांनी वारंवार कार्यालयात भेट देऊन तक्रारी केल्या होत्या.विशेषतः खरेदी नोंद, वारस नोंद, मृत्यू नोंद, बोजा नोंद कमी करणे तसेच मिळकतीतील नाव आणि क्षेत्रफळातील तांत्रिक दुरुस्ती या कामांबाबत मोठ्या प्रमाणात प्रलंबित प्रकरणे असल्याचे तक्रारींमध्ये नमूद करण्यात आले होते.
दरम्यान, संबंधित कर्मचाऱ्याने दीर्घकाळ कोणतीही ठोस कारवाई न करता ही कामे प्रलंबित ठेवल्याचे नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांना वारंवार कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) कार्यकर्त्यांनी 23 जानेवारी 2026 रोजी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्या कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करण्याची मागणी करणारे निवेदन दिले होते. त्यानंतर 27 जानेवारी 2026 रोजी जिल्हा अधीक्षक भूमीअभिलेख कार्यालय सोलापूर यांच्यावतीने प्रलंबित कामांबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.मात्र अद्यापपर्यंत त्या नोटीसींना कोणताही खुलासा सादर करण्यात आलेला नसल्याचे समोर आले आहे.

नोटीसमध्ये नमूद केल्याप्रमाणे संबंधित कर्मचाऱ्याने महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 च्या नियम (3) चा भंग केला असून कोणताही रजेचा अर्ज न देता आणि परवानगी न घेता तब्बल 12 दिवस कार्यालयात अनुपस्थित राहिल्याचा आरोप आहे.

याशिवाय महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 (5) (1) (4) नुसार वेतन रोखण्याची शिक्षाही देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तरीही मंगळवार (दि.10) रोजी संबंधित कर्मचारी कार्यालयात न येता घरीच बसून काम करत असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागल्या.

माहितीनुसार, सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास तो कर्मचारी कार्यालयात हजर झाला. कोणताही शासकीय नियम नसताना घरातून कामकाज केल्याचेही उघड झाले असून कोरोना काळातील पद्धतीचा आधार घेत घरातून काम पाहिल्याची चर्चा सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर आता वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कठोर कारवाई करणार का, की पुन्हा एकदा प्रकरणावर पांघरूण घातले जाणार, याकडे मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे. यापूर्वीही या कर्मचाऱ्या विरोधात आंदोलन झाले होते; मात्र ठोस कारवाई न झाल्यामुळे परिस्थिती अधिकच बिघडल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

Leave a Reply

Back To Top