विधानपरिषद निवडणूक 2026: एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल : डॉ.नीलम गोऱ्हे व बच्चू कडू यांचे शक्तीप्रदर्शन

विधानपरिषद निवडणूक 2026: एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल : डॉ.नीलम गोऱ्हे व बच्चू कडू यांचे शक्तीप्रदर्शन

रणरागिणी डॉ.नीलम गोऱ्हे पुन्हा मैदानात; महिला सक्षमीकरणाचा ठाम संदेश देत शिंदेंची मोठी चाल

Mumbai shivsena news: मुंबई | ज्ञानप्रवाह न्यूज, दि.३०/०४/२०२६ : उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज विधानभवनात विधानपरिषदेच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी डॉ. गोऱ्हे यांच्यासोबत, ओमप्रकाश बाबाराव उर्फ बच्चू कडू यांनी देखील शिवसेनेकडून अर्ज दाखल केला. याप्रसंगी उद्योग मंत्री उदय सामंत, शिवसेना सरचिटणीस माजी खासदार राहुल शेवाळे , आमदार मुरजी पटेल आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या कृतीशीलतेचा वारसा पुढे चालवला आहे. त्यातील एक सैनिक म्हणून मला हे फार महत्त्वाचे वाटते. हा एक वेगळा अनुभव आहे. महिलांना राजकीय आरक्षण मिळाल्याने राजकारणात महिलांच्या प्रतिनिधित्वात वाढ होत आहे. त्यादृष्टीने सुप्रशासनाकडे नेणारे पुढचे महत्त्वाचे पाऊल आजच्या विधानपरिषद निवडणुकीमुळे पडले आहे, अशी भावना डॉ.नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

डॉ. गोऱ्हे यांचा थोडक्यात कार्यप्रवास पुढीलप्रमाणे, डॉ. नीलम दिवाकर गोऱ्हे (जन्म: १२ सप्टेंबर १९५४, पंढरपूर) या आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. त्यांनी मुंबई विद्यापीठातून बी.ए.एम.एस. पदवी प्राप्त केली असून, बँकॉक येथील एशियन लोकविकास संस्थेतून प्रशिक्षणही घेतले आहे. त्यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांवर प्रभुत्व आहे. कट्टर शिवसैनिक यासोबतच महिलांच्या हक्कांसाठी, अन्यायग्रस्त महिलांच्या मदतीसाठी आणि सामाजिक कार्यासाठी त्या ओळखल्या जातात.

राजकीय क्षेत्रात त्या २००२ पासून सातत्याने विधानपरिषदेवर निवडून येत आहेत. ही त्यांची प्रतिनिधित्व करण्याची पाचवी वेळ आहे. २०१९ पासून त्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती पदावर कार्यरत होत्या. २०२२ मध्ये काही काळ त्यांनी प्रभारी सभापती म्हणूनही काम पाहिले आहे. २०२४ मध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला, ज्यामुळे त्या विधानपरिषदेत ऊत्तम कार्य नेत्यांमध्ये त्यांनी स्थान मिळवले आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात त्या ‘रणरागिणी’ म्हणून प्रसिद्ध आहेत. विधानपरिषदेत महिलाविषयक मुद्दे, ग्रामीण विकास, कायदे सुधारणा आणि सामाजिक न्याय यांसारख्या विषयांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. पक्षाच्या महिला आघाडीला मजबूत करण्यातही त्यांचा मोठा वाटा आहे.

आज अर्ज दाखल करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. गोऱ्हे यांच्या दीर्घकाळीन राजकिय अनुभव, विधानपरिषदेतील कामगिरी आणि पक्षप्रतिष्ठेसाठी केलेल्या योगदानाची दखल घेतली आहे. पक्षातील महिला नेत्यांना पुन्हा संधी देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना प्रोत्साहन देण्याचा संदेश दिला आहे.

या उमेदवारीमुळे शिवसेना आगामी निवडणुकीत आपली संघटनात्मक ताकद आणि महिला नेतृत्वावरचा विश्वास अधोरेखित करत आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक आक्रमक रणनीतीने मैदानात उतरल्याचे संकेत मिळत आहेत.

Leave a Reply

Back To Top