बार्शीत लाचलुचपत विभागाचा मोठा डल्ला; ३ हजारांची लाच घेताना मंडळ अधिकारी जाळ्यात
७/१२ उताऱ्यावरील वारस नोंदीसाठी मागितली लाच; सोलापूर ACB कडून हेमंत फुलारींना रंगेहाथ अटक
Barshi crime news : बार्शी जि. सोलापूर |ज्ञानप्रवाह न्यूज: जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर वारस म्हणून आजीचे नाव नोंदवण्यासाठी आणि उताऱ्याचे लॉक काढून देण्यासाठी ३,००० रुपयांची लाच घेणाऱ्या उपळे (दुमाला) येथील मंडळ अधिकाऱ्याला सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
हेमंत चंद्रकांत फुलारी वय ५३ असे अटक करण्यात आलेल्या लोकसेवकाचे नाव आहे. ते बार्शी तहसील कार्यालयांतर्गत उपळे (दुमाला) मंडळात मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
तक्रारदाराच्या वडिलांचे निधन झाले होते असून, त्यांच्या नावावर असलेल्या शेतजमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर आजीचे नाव वारस म्हणून लावण्यासाठी तक्रारदाराने अर्ज केला होता. तलाठ्याने घेतलेली नोंद प्रमाणित करण्यासाठी आणि ७/१२ उताऱ्याचे लॉक Dermatology (Unlock) आरोपी फुलारी यांनी ३,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

याप्रकरणी तक्रारदाराने सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागा कडे धाव घेतली. आज दि. २८ एप्रिल २०२६ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान फुलारी यांनी पंचांसमक्ष लाचेची मागणी मान्य करून ती रक्कम स्वीकारली. त्याच वेळी दबा धरून बसलेल्या ACB च्या पथकाने त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे,अप्पर पोलीस अधीक्षक अजित पाटील आणि पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलेश पवार, रवींद्र लांभाते व त्यांच्या पथकाने केली.

