एक दिवस लेखकाला सुपरस्टारपेक्षा जास्त पैसे मिळतील', हे म्हणणं खरं करून दाखवणारे सलीम-जावेद


Salim-Javed
शोले, दीवार, डॉन, जंजीर सारखे चित्रपट आठवतायेत. किंबहुना वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर जवळपास आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात या चित्रपटांनी, त्यातील संवाद आणि नाट्यानं गारुड घातलेलं आहे. या चित्रपटातील जादूमागचे जादूगार म्हणजे सलीम-जावेद.

या आठवड्यात ख्यातनाम पटकथा लेखक सलीम-जावेद यांच्या जीवनावर आधारित माहितीपटाची मालिका (डॉक्युमेंटरी सिरीज) प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होते आहे. या माहितीपटाचं नाव आहे…'दि अँग्री यंग मेन'.

 

किंबहुना यापेक्षा वेगळं आणि चांगलं शीर्षक या लेखकद्वयीवरील माहितीपटासाठी असू शकत नाही.

पटकथा लेखकांवर माहितीपट तयार होणं, ही भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील एक अनोखी आणि मोठी घटना आहे.

सर्वसाधारणपणे अभिनेता, अभिनेत्री, निर्माता, दिग्दर्शक, संगीतकार आणि गायक-गायिकांवर माहितीपटापासून ते चरित्रपटांची निर्मिती झाली आहे. मात्र पटकथालेखकांच्या (स्क्रीनप्ले रायटर्स)

 

बाबतीत असं काहीही झालेलं नाही.

कारण पटकथा लेखकांना अभिनेता, अभिनेत्री, निर्माता, दिग्दर्शक, संगीतकार यांच्याइतकं महत्त्व कधी दिलंच गेलं नाही. पटकथा लेखकांना हा सन्मान पहिल्यांदा मिळवून दिला सलीम-जावेद या जोडीनं. म्हणूनच हा माहितीपट तयार होणं ही काही सामान्य बाब नाही.

 

लेखकांशिवाय कोणत्याही चित्रपटाचा विचारच केला जाऊ शकत नाही. मात्र सर्वसाधारणपणे चित्रपटाच्या यशात लेखकांना स्थान गौण होतं. सलीम-जावेद यांनीच लिहिलेल्या 'मिस्टर इंडिया' या पात्राप्रमाणेच श्रेयामधून लेखकांना गायब केलं जात होतं.

 

मात्र 50 वर्षे उलटून गेल्यानंतर देखील पटकथा लेखनाच्या क्षेत्रात सलीम-जावेद यांचा प्रभाव तितकाच आहे. पटकथा लेखनाचे ते एकप्रकारे सुपरस्टारच आहेत.

लेखकांची ही जोडी नेमकं काम कसं करत असेल?

मी बालपणी पहिल्यांदा 'जंजीर' चित्रपट पाहिला. त्यावेळेस माझ्या मनात विचार आला की अमिताभ बच्चननं काय जबरदस्त संवाद म्हटले आहेत – “जब तक बैठने को न कहा जाए शराफ़त से खड़े रहो, ये पुलिस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नहीं”.

 

चित्रपट पाहिल्यावर मी अमिताभ बच्चन यांचा फॅन झालो. मला वाटायचं की हे संवाद अमिताभ बच्चन त्यांच्या मनानेच बोलत असतील.

 

मागाहून कळलं की हे संवाद स्वत: अमिताभ बच्चन यांनी विचार करून म्हटलेले नाहीत. मला कळालं की हे संवाद सलीम-जावेद यांनी लिहिले आहेत.

बालपणी अनेक वर्षे मला असंच वाटत होतं की सलीम जावेद नावाचा एक माणूस आहे आणि तोच हे जबरदस्त संवाद लिहितो.

आमचे एक कौटुंबिक मित्र होते आणि त्यांचं नाव देखील सलीम जावेद होतं.

 

असो, अमिताभ बच्चन यांचा फॅन असल्यामुळे त्या नादात मी त्यांचे अनेक चित्रपट पाहिले. यात एक गोष्ट कॉमन होती. ते म्हणजे या सर्व चित्रपटांची पटकथा सलीम जावेद यांनी लिहिली होती.

 

नंतरच्या काळात मला ही बाब स्पष्ट झाली की सलीम जावेद ही एकच व्यक्ती नसून दोन लेखक आहेत. ते एकत्रितपणे चित्रपटाची पटकथा लिहितात. हे समजल्यावर मला खूपच आश्चर्य वाटलं.

 

दोघे मिळून लिखाण करतात याचा अर्थ काय? मनात प्रश्न आला की दोघांमध्ये कोण काय लिखाण करतं?

 

म्हणजे असं असेल का, की ‘मेरे पास बंगला है, गाडी है, बैंक बैलेंस है’ हे वाक्य जावेद अख्तर यांनी लिहिलं असेल? आणि त्यानंतरचं वाक्य 'मेरे पास मां है' सलीम खान यांनी लिहिली असेल?

 

'जब तक बैठने को न कहा जाए…' पर्यंत कदाचित सलीम खान यांनी लिहिलं असेल आणि त्यानंतरचं वाक्य “ये पुलिस स्टेशन है तुम्हारे बाप का घर नहीं” जावेद अख्तर यांनी लिहिलं असेल?

 

'बुराई ने बंदूक चलाना सिखा दिया था, नेकी हल चलाना सिखा देगी' काय जबरदस्त डायलॉग होता तो.

 

असं असेल का की जय चे संवाद सलीम खान यांनी लिहिले असतील आणि वीरू चे संवाद जावेद अख्तर यांनी? बालपणात चित्रपटांविषयी असलेल्या वेडापायी मी अनेकदा अशाप्रकारे अनेक आवडत्या संवादाबद्दल दोघांनाही अर्धं-अर्धं श्रेय देऊन खूश व्हायचो.

 

या जोडीत कामाची विभागणी कशी होती?

अनेक वर्षांनंतर मी पत्रकारिता करू लागलो आणि तीही चित्रपटांशी निगडित. तेव्हा सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्याशी स्वतंत्रपणे भेट झाली. तेव्हाही माझ्या मनात हा प्रश्न होताच.

 

आतापर्यंत इतकं समजलं होतं की चित्रपट लेखनात मूलत: तीन गोष्टी प्रमुख असतात – कथा, पटकथा (स्क्रीनप्ले) आणि संवाद. या तिन्हींचं श्रेय सलीम-जावेद यांना एकत्रितपणे दिलं जायचं.

2014 मध्ये माझ्या पहिल्या पुस्तकाची (राजेश खन्ना यांचे चरित्र) प्रस्तावना सलीम खान यांनीच लिहिली.

त्यांना भेटल्यावर मी प्रश्न विचारला होता की तुम्हा दोघांच्या जोडीत कोणाचं काय काम असायचं.

त्यावर त्यांनी उत्तर दिलं होतं, “आमचं ट्युनिंग इतकं उत्तम होतं की माझं काम कुठे सुरू व्हायचं आणि जावेद साहेबांचं काम कुठे संपायचं, हे सांगता येणं अवघड आहे.”

“ही सर्व प्रक्रिया आपोआपच होत जायची. ही अतिशय क्लिष्ट स्वरूपाची क्रिएटिव्ह अॅक्टिव्हिटी आहे. आम्हा दोघांचे विचार एकाच दिशेनं, एकाच गतीनं चालायचे.”

 

हे काही स्पष्ट उत्तर नव्हतं. मी त्यांना वेगवेगळ्या प्रकारे विचारून पाहिलं मात्र त्यांच्याकडून स्पष्ट उत्तर मिळालं नाही. मग अनेक वर्षांपूर्वी एका मुलाखतीत जावेद अख्तर यांनासुद्धा हाच प्रश्न विचारला होता.

 

तेव्हा ते म्हणाले होते, “आम्ही दोघं एका टीमप्रमाणे काम करायचो. नेमकं कोण काय करायचं, याचं उत्तर देणं योग्य ठरणार नाही,” इथेसुद्धा या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर मिळालं नाही.

 

सलीम-जावेद यांच्यावर लेखक दीप्तोकीर्ति चौधरी यांनी 'रिटन बाय सलीम-जावेद' हे प्रसिद्ध पुस्तक लिहिलं आहे.

 

दीप्तोकीर्ति चौधरी यांनी मला सांगितलं, “लेखनाच्या कामाची विभागणी कशी व्हायची, याबद्दल जावेद साहेब नेहमी सांगायचे की मी नाम (नाऊन्स) लिहायचो आणि सलीम साहेब क्रियापदं (वर्ब्स).”

 

आता हे उघड आहे की चेष्टेच्या स्वरात प्रश्न टाळण्याची ही पद्धत होती. अनेक वर्षे हे दोघं या प्रश्नाचं उत्तर देणं टाळत राहिले.

 

जावेद अख्तर यांनी उघड केलं गुपित

चित्रपट जगतात वेगवेगळ्या लोकांकडून यासंदर्भात निरनिराळ्या गोष्टी देखील ऐकण्यास मिळाल्या.

 

यातील काही चर्चा अशा होत्या, “जावेद साहेबच लिखाण करायचे. सलीम साहेबांचं काम जनसंपर्क (Public Relation) करणं आणि पटकथा वाचून दाखवण्याचं होतं”, “सर्व पटकथा हॉलीवूडच्या चित्रपटांवरून घेतलेल्या होत्या.”

 

“शोले चित्रपटाची कल्पना देखील 'मेरा गांव मेरा देश' या चित्रपटावरून घेण्यात आली होती”, “दोघं खूपच उद्धट होते आणि निर्मात्यांसमोर चित्रविचित्र अटी ठेवायचे” इत्यादी.

 

मात्र या सर्व चर्चेनंतरसुद्धा मुख्य प्रश्न अनुत्तरीतच होता. शेवटी, अनेक वर्षांनी या महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर जावेद अख्तर यांनी दिलं.

 

मागील वर्षी (मे 2023) लेखिका नसरीन मुन्नी कबीर यांनी लिहिलेल्या 'जावेद अख्तर-टॉकिंग लाइफ' या पुस्तकाचं प्रकाशन लंडनच्या प्रसिद्ध ब्रिटिश लायब्ररीमध्ये होतं. त्यावेळेस मला जावेद अख्तर यांच्याशी सविस्तर बोलण्याची संधी मिळाली.

 

मी हा प्रश्न त्यांना पुन्हा विचारला की तुम्ही आणि सलीम खान यांच्या टीममध्ये कोण काय करायचं?

 

यावेळेस मात्र त्यांनी मोकळेपणानं उत्तर दिलं. “आम्ही लिहिलेल्या बहुतांश चित्रपटांच्या कथेची कल्पना, कथा जवळपास प्रत्येक वेळेस सलीम साहेबांच्याच होत्या. दीवार, त्रिशूल, शोले, डॉन या सर्व चित्रपटांची मुख्य कथा सलीम साहेबांचीच होती.”

 

“कथेत नाट्यमयता आणणं, धक्का देणं (ट्विस्ट अॅंड टर्न) तेच करायचे आणि अॅंग्री यंग मॅनचं व्यक्तिमत्त्व ही कल्पना देखील त्यांचीच होती.”

नसरीन मुन्नी कबीर लिखित याच नव्या पुस्तकात जावेद अख्तर यांनी स्पष्टपणे सलीम खान यांना कथेच्या कल्पनेचं श्रेय दिलं आहे.

 

ते म्हणतात, “शोले चित्रपटात एक ठाकूर आहे. त्याचे दोन्ही हात एका भयानक खलनायकानं कापले आहेत. तो ठाकूर आपल्या गावाच्या संरक्षणासाठी दोन तरुणांना बोलावतो. ही सर्व कल्पना सलीम साहेबांची होती.”

 

शोले चित्रपटाची उल्लेख करताना जावेद अख्तर आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतात. “शोले चित्रपटाची पटकथा लिहिण्यात रमेश सिप्पी यांचा देखील वाटा होता. मात्र त्यांना याचं श्रेय देण्यात आलं नाही.”

 

हे तर झालं सलीम खान यांच्या योगदानाबद्दल. “मग पुढचं पाऊल काय असायचं आणि तुमचं काम कुठून सुरू व्हायचं?” असं मी जावेद अख्तर यांनी विचारलं.

 

“माझं काम सुरू व्हायचं पटकथेपासून. आम्ही दोघं मिळून पटकथा लिहायचो. त्यांची कथेची कल्पना (स्टोरी आयडिया) 10-15 मिनिटांची असायची. त्यानंतर आम्ही एकत्र बसून एक-एक दृश्य लिहून अडीच तासांचा संपूर्ण चित्रपट लिहायचो.”

 

“पटकथा लिहित असतानादेखील त्यामध्ये नवीन पात्र, नवीन घटना आणि दृश्यं जोडली जायची. यात आम्हा दोघांचंही योगदान होतं. याचं सर्व श्रेय कोणा एकाचं नाही. मात्र पटकथा लिहून झाल्यानंतर संवाद लिहिण्याची जबाबदारी माझी असायची.”

 

याचा अर्थ स्पष्ट आहे. दीवार चित्रपटातील “मेरे पास मां है” किंवा “मैं जब भी किसी दुश्मनी मोल लेता हूं तो सस्ते महंगे की परवाह नहीं करता” किंवा “डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन है” हे सर्व प्रसिद्ध संवाद जावेद अख्तर यांनीच लिहिले आहेत.

 

“होय. मात्र त्याच डॉन चित्रपटाची अफलातून कथा आणि त्यातील सर्व नाट्यं पूर्णपणे सलीम साहेबांनी लिहिलं होतं.” असं जावेद अख्तर म्हणाले. कथा-पटकथा-संवाद या सर्व बाबतीतील दोघांच्या भूमिका, काम या गोष्टीबद्दल जावेद अख्तर यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं.

बॉलीवूडमधील अभूतपूर्व यश आणि सलीम-जावेद युग

सलीम-जावेद यांच्या जोडीनं 24 चित्रपट लिहिले. यातील 20 चित्रपट यशस्वी झाले. ही एक जबरदस्त कामगिरी आहे. मात्र यशाच्या काळात या दोघांवरही एक आरोप व्हायचा. तो म्हणजे त्यांच्या चित्रपटाची कथा ओरिजिनल नसून हॉलीवूडच्या चित्रपटांवर बेतलेली असायची.

 

मी सलीम साहेबांनी याबद्दल विचारलं. तेव्हा ते म्हणाले, “हे पाहा, ओरिजिनल असं तर या जगात काहीही नसतं. प्रत्येक गोष्ट कुठेना कुठे घडलेली असते. जर कोणी म्हणत असेल की हे ओरिजिनल काम आहे, तर समजा की तो खोटं बोलतो आहे. आम्ही कधीही नक्कल केली नाही.”

 

“मी खूप वाचन करायचो. जवळपास दररोज ग्रंथालयात जायचो. प्रत्येक विषयावरील पुस्तकं आणि कादंबऱ्या वाचायचो. आमच्याकडे एका दृश्यासाठी अनेक कल्पना असायच्या.”

 

परदेशी किंवा हॉलीवूड चित्रपटांच्या प्रभावाबद्दल जावेद अख्तर म्हणाले, “आमच्यावर आपल्या क्लासिक चित्रपटांचा जास्त प्रभाव असायचा. मुगले आजम, मदर इंडिया, गंगा जमुना या हिंदी चित्रपटांचा.”

 

“मात्र त्याचबरोबर मी अमेरिकन चित्रपट आणि कादंबऱ्यांचा देखील मोठा चाहता होतो. जेम्स हॅडली चेज आणि रेमन चॅंडलर यांच्या कादंबऱ्या मला आवडायच्या. एका ओळीच्या संवादाचा प्रभाव (वन लायनर इम्पॅक्ट) मला कळत होता.”

माझ्यावर इब्ने सफी आणि पुरोगामी लेखकांचा प्रभाव होता. विशेष करून किशन चंदर यांचं लिखाण मी खूप वाचायचो.”

 

“जर एखादं पुस्तक आवडलं तर मी ते सलीम साहेबांना सुद्धा द्यायचो. 'जंजीर' चित्रपट हिट झाला. तेव्हा कोणीतरी लिहिलं की 'डर्टी हॅरी' या हॉलीवूडच्या चित्रपटाची ही नक्कल आहे.”

 

“हे पाहा, या दोन्ही चित्रपटात फक्त एकच समानता होती ती म्हणजे दोन्ही चित्रपटाचा नायक एक रागीट पोलिस अधिकारी होता. 'जंजीर' चित्रपटाची कथा सलीम साहेबांनी लिहिली होती.”

 

“आणखी एक गोष्ट सांगू, आम्ही 'डर्टी हॅरी' ची नक्कल तर केली नाही, मात्र हिंदीमध्ये 'डर्टी हॅरी' चित्रपट बनला होता. त्या चित्रपटाचं नाव होतं 'खून खून' (1973). तो चित्रपटात दणकून आपटला होता.”

 

सुपरस्टार जोडी जेव्हा तुटली

प्रत्येक यशाला उतार किंवा घसरण असते. जून 1981 मध्ये चित्रपट विश्वातील सुप्रसिद्ध सलीम-जावेद जोडी तुटली. दोघेही वेगळे झाले. इथून पुढे ते एकत्र काम करणार नव्हते.

 

यानंतर दोघांनीही स्वतंत्रपणे एक-एकट्यानं चित्रपट लिहिले. जावेद अख्तर यांनी बेताब, दुनिया, मशाल, अर्जुन, डकैत, मेरी जंग आणि रूप की रानी चोरों का राजा यासारख्या चित्रपटांचं लेखन केलं. यातील बेताब आणि अर्जुन हे चित्रपट हिट झाले.

 

तर सलीम खान यांनी नाम, कब्जा, तूफान, अकेला आणि पत्थर के फूल यासारख्या चित्रपटांचं लेखन केलं. यात फक्त 'नाम' या चित्रपटाला मोठं यश मिळालं.

 

सलीम-जावेद या जोडीला जसं जबरदस्त, ब्लॉकबस्टर यश मिळालं होतं तसं यश या दोघांनाही एकट्यानं पटकथा लेखनाचं काम करताना मिळालं नाही.

 

या जोडीचं चरित्र लिहिणारे लेखक दीप्तोकीर्ति चौधरी यांनी सांगितलं की “त्यांनी सत्तरच्या दशकात जे चित्रपट लिहिले त्यामध्ये खूपच ताजेपणा होता, नाविन्य होतं.”

 

“जंजीर, दीवार, त्रिशूल किंवा अॅंग्री यंग मॅन सारखं हिंदी चित्रपटात आधी कधीही झालं नव्हतं. सलीम-जावेद वेगळे झाल्यानंतर देखील ते याच पात्रावर आधारित चित्रपट लिहित राहिले.”

“सलीम खान यांनी लिहिलेल्या 'नाम' चित्रपटात संजय दत्तची प्रमुख भूमिका आहे. यातील संजय दत्तचं पात्र हे अॅंग्री यंग मॅनच तर आहे. 1980 चा बेरोजगार, नैराश्य आलेला तरुण.”

 

“सलीम खान यांनीच लिहिलेल्या 'अकेला' चित्रपटात तर अमिताभच अॅंग्री यंग मॅन होते. वास्तविक पाहता तोपर्यंत त्यांचं वय झालं होतं, ते तरुण राहिले नव्हते.”

 

“जावेद अख्तर यांच्या मेरी जंग, अर्जुन, डकैत… या सर्व चित्रपटांचा नायक सुद्धा अॅंग्री यंग मॅनच होता.”

 

“एक दशक उलटल्यानंतर अॅंग्री यंग मॅन आणि त्याचा राग यात कोणतंच नाविन्य राहिलं नव्हतं. त्यामुळेच या दोघांच्या नंतरच्या चित्रपटांना आधीसारखं यश मिळालं नाही.”

 

लेखकद्वयीचा चित्रपट क्षेत्रातील प्रभाव

सलीम-जावेद यांना जवळून ओळखणारे सांगतात की आणखी एक खास गोष्ट जी जोडी वेगळी झाल्यामुळे घडली. ती म्हणजे, हे दोघेही एकमेकांचा आत्मविश्वास वाढवायचे.

 

लेखक दीप्तोकीर्ति चौधरी या मुद्द्याशी निगडित एक किस्सा सांगतात, “ही जोडी म्हणजे पटकथा लेखनाची डॉन होती. विचार करा, 'जंजीर' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, तेव्हा त्याच्या पोस्टरवर निर्माता-दिग्दर्शकाचं नाव होतं. मात्र लेखकाचं नाव नव्हतं.”

 

“प्रकाश मेहरा या दोघांना म्हणाले, पोस्टरवर लेखकांचं नाव? असं कुठे असतं का? मात्र सलीम-जावेद हिंमतीचे होते. ते घाबरणारे किंवा दबावात येणारे नव्हते.”

 

“त्यांनी एका माणसाला पैसे दिले आणि सांगितलं की रात्रभरात संपूर्ण शहरात लावण्यात आलेल्या पोस्टरवर, 'रिटन बाय सलीम-जावेद' असं लिहायचं. त्याआधी असं कोणीच केलं नव्हतं.”

 

“ही एक जबरदस्त घटना आहे. मला वाटतं की असं करताना या दोघांनी एकमेकांना धीर दिला असेल. मात्र हे दोघे वेगळे झाल्यानंतर ती हिंमत, ते धैर्य कमी होत गेलं.”

 

आणि मग 'रिटन बाय सलीम-जावेद' असं शेवटचं एका चित्रपटाच्या श्रेयनामावलीत आलं. तो चित्रपट होता, 'मिस्टर इंडिया'. हा चित्रपट सलीम-जावेदची जोडी तुटल्यानंतर सहा वर्षांनी 1987 मध्ये प्रदर्शित झाला होता.

 

मात्र सलीम-जावेद यांच्या नावानं पुन्हा एकदा जादू केली आणि चित्रपट सुपरहिट झाला.

अर्थात 'जावेद अख्तर-टॉकिंग लाइफ' या पुस्तकात जावेद अख्तर म्हणतात, 'मिस्टर इंडिया' या चित्रपटाची पटकथा मी स्वत:च लिहिली होती. त्यानंतर मी संवाद देखील लिहिले.”

 

“चित्रपटाचे निर्माते बोनी कपूर यांना मी सांगितलं की या चित्रपटाच्या श्रेयनामावलीत सलीम-जावेदचं नाव देण्यात यावं. कारण या कथेच्या कल्पनेचा जन्म 'सलीम-जावेद' जोडीच्या काळात झाला होता.”

 

तो काळ पुन्हा आला नाही, मात्र सलीम-जावेद नावाची जादू आणि प्रभाव आजही हिंदी चित्रपट विश्वात जाणवतो.

 

गुरुदत्त यांच्या चित्रपटांचं लेखन प्रसिद्ध चित्रपट लेखक अबरार अल्वी करायचे. कित्येक वर्षांआधी सलीम खान अबरार अल्वी यांना म्हणाले, “लक्षात ठेवा, एक दिवस लेखक चित्रपटाच्या नायकापेक्षा जास्त पैसे घेतील.”

त्यावर अबरार अल्वी यांनी डोळे विस्फारून आश्चर्यानं उत्तर दिलं होतं की, “काहीही सांगत आहात. असं कधीच होणार नाही.”

मात्र असंच घडलं. सलीम-जावेदच्या जोडीनं ते करून दाखवलं. या घटनेनंतर अनेक वर्षांनी 'दोस्ताना' या चित्रपटासाठी सलीम-जावेद जोडीला सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा पन्नास हजार रुपये अधिक देण्यात आले होते.

म्हणूनच आज चित्रपट लेखकांची जी स्थिती आहे ते पाहून जाणवतं की सलीम-जावेद यांनी जे केलं, त्याची पुनरावृत्ती होणं बहुधा, 'मुश्किल ही नहीं नामुमकिन है'.

(लेखकानं गुरुदत्त, राजेश खन्ना, संजय दत्त आणि रेखा यांच्या जीवनावर पुस्तकं लिहिली आहेत.)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

Published By- Priya Dixit

 

 

 

 

 

 

 

 

 

 



Source link


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading