…आणि महाराष्ट्रातील राजकारण फिरले; राष्ट्रवादीनं शेअर केला ‘तो’ व्हिडिओ


हायलाइट्स:

  • राष्ट्रवादी काँग्रेसनं शेअर केला दोन वर्षांपूर्वीचा व्हिडिओ
  • भारतीय जनता पक्षाला हाणला बोचरा टोला
  • काय आहे राष्ट्रवादीनं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये?

मुंबई: राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांमागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. दर काही दिवसांनी छापे टाकले जात आहेत. समन्स बजावले जात आहेत. हे सगळं सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसनं दोन वर्षांपूर्वीचा, आजच्या दिवशीचा (२७ सप्टेंबर) एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा दिवस राज्यातील राजकीय घडामोडींना कलाटणी देणारा होता, असं राष्ट्रवादीनं म्हटलं आहे. (NCP Shares Old Video)

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी ईडी मोठ्या प्रमाणात सक्रिय झाली होती. विरोधी पक्षातील नेत्यांना नोटिसा बजावून चौकशीला बोलावलं जात होतं. अनेक नेते ईडीच्या कार्यालयात हजेरी लावून आले होते. दिवस-दिवसभर त्यांची चौकशी झाल्याच्या बातम्या येत होत्या. त्याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ईडीनं नोटीस बजावल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळं राज्यातील राजकारण ढवळून निघालं. शरद पवार काय भूमिका घेणार, याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर शरद पवार यांनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. २७ सप्टेंबर रोजी दुपारी मी स्वत: ईडीच्या कार्यालयात हजर राहणार. माझ्या संदर्भातील जी काही माहिती त्यांना हवी असेल ती देणार. त्याशिवाय, त्यांचा जो काही पाहुणचार असेल तोही घेणार, असं पवारांनी जाहीर केलं.

वाचा: ‘आनंदराव अडसुळांवर ईडीनं केलेली कारवाई मराठी माणसांना न्याय देणारी’

शरद पवारांनी ईडीला थेट अंगावर घेण्याची भूमिका घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसही आक्रमक झाली. कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. पवारांसोबत सर्व कार्यकर्ते ईडीच्या कार्यालयात जाणार, असं जाहीर करण्यात आलं. त्यामुळं प्रचंड तणाव निर्माण झाला. अखेर ईडीनं स्वत:च शरद पवार यांना चौकशीसाठी येण्याची गरज नाही. तूर्त त्याची आवश्यकता नाही, असं स्पष्ट केलं. त्यामुळं पवार ईडीच्या कार्यालयात गेले नाहीत. मात्र, त्यामुळं विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एक जोश निर्माण झाला. सत्ताधारी पक्षाला सडेतोड उत्तर दिलं जाऊ शकतं, असा विश्वास त्यांच्यात निर्माण झाला. तेव्हापासून बदललेलं वातावरण निवडणुकीच्या प्रचारादरम्यानही कायम राहिलं आणि राज्यात नवी समीकरणं उदयास आली. सत्ताबदल झाला.
राष्ट्रवादी काँग्रेसनं पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही आठवण शेअर केली आहे. ‘सूडाच्या राजकारणाला मात देणारा, महाराष्ट्रातील घडामोडींना निर्णायक वळण देणारा, दिल्लीच्या तख्त़ासमोर महाराष्ट्र झुकत नाही, या इतिहासाची पुनरावृत्ती करणारा हाच तो दिवस…,’ असं राष्ट्रवादीनं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: