कोल्हापूरचा ब्रँड जागतिक स्तरावर आपल्या वेगळेपणाचा ठसा उमटवेल

कोल्हापूरचा ब्रँड जागतिक स्तरावर आपल्या वेगळेपणाचा ठसा उमटवेल – कोल्हापूर विमानतळावरील प्रवाशांनी व्यक्त केला विश्वास
   कोल्हापूर, दि.27 (जिमाका): विविधतेने नटलेल्या कोल्हापूर जिल्ह्याची ओळख 'राजर्षी शाहूंची भूमि म्हणून जगभरात आहे. आता कोल्हापूरचा ब्रँडही जागतिक स्तरावर आपल्या वेगळेपणाचा ठसा नक्कीच उमटवेल, असा विश्वास कोल्हापूर विमानतळावरील प्रवाशांनी व्यक्त केला..निमित्त होते.. जागतिक पर्यटन दिन सप्ताहानिमित्त आयोजित विविध उपक्रमांच्या उद्घाटनाचे!

    राजर्षी शाहू महाराजांच्या पोर्ट्रेटचे अनावरण तसेच कोल्हापूर जिल्ह्याच्या विविध वैशिष्ट्यांवर आधारित 'डेस्टिनेशन कोल्हापूर' व 'कोल्हापूर पर्यटन' या ब्रँडच्या घडीपत्रिकांचे वितरण विमानतळावरील प्रवाशांच्या हस्ते करण्यात आले. तसेच घडीपत्रिकांचे बोर्ड (स्टँडी) चे अनावरण करण्यात आले. 

    यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, विमानतळ विकास प्राधिकरणचे संचालक कमल कटारिया, विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) विशाल माळी, तहसीलदार शितल मुळे - भामरे, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, निसर्ग अभ्यासक तथा वन्यजीव छायाचित्रकार सुनील करकरे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व प्रवासी उपस्थित होते.

    यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य तथा माजी परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळ्ये यांनी 'कोल्हापूर जिल्हा पर्यटन सप्ताह' हा स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगितले. जगभरातील नागरिकांनी कोल्हापूरमध्ये यावे आणि इथले वन्यजीव, निसर्ग संपदा, गड-किल्ले,कृषी ,उद्योग, धार्मिक स्थळे पहावीत त्याचबरोबर तांबडा पांढरा रस्सा व शाकाहारी, मांसाहारी भोजनाची चव आवर्जून घ्यावी, असे आवाहन केले.

  यावेळी उपस्थित प्रवाशांनी कोल्हापूर जिल्ह्या मध्ये विपुल साधन संपदा, हिरवागार निसर्ग, जिभेवर रेंगाळणारे चविष्ट पदार्थ आणि धार्मिक, ऐतिहासिक, वन पर्यटन स्थळे, वास्तू असून येथील पर्यटनाची माहिती सर्वदूर पोहोचेल, असा विश्वास प्रवाशांनी व्यक्त केला. दरम्यान अश्विन जैन व श्रेया जैन या प्रवाशांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराजांच्या पोर्ट्रेट चे अनावरण करण्यात आले तर विशाल चंदवानी व रिशिता चंदवानी यांच्या हस्ते ब्रोशर माहितीपत्रके असणाऱ्या स्टँडी चे अनावरण करण्यात आले . कायरा व माईशा या छोट्या प्रवाशांच्या हस्ते फीत कापून अनोख्या पद्धतीने कार्यक्रम साजरा करण्यात आला.

     यावेळी विमानतळावर लावण्यात आलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील वन्यप्राण्यांच्या चित्रांची पाहणी करुन पर्यटकांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने आवश्यक बाबींबाबत संचालक कटारिया यांच्याशी चर्चा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: