मटक्याचा आकडा वर्षानुवर्षे सुरक्षित राहतो ;मग देशातील मोठी परीक्षा NEET चाच पेपर वारंवार लीक का ?

मटक्याचा आकडा वर्षानुवर्षे सुरक्षित राहतो ;मग देशातील मोठी परीक्षा NEET चाच पेपर वारंवार लीक का ?

कडक सुरक्षा, डिजिटल यंत्रणा आणि तरीही NEET पेपरफुटी शिक्षण व्यवस्थेवरील मोठे प्रश्नचिन्ह

देशातील सर्वात महत्त्वाच्या वैद्यकीय प्रवेश परीक्षांपैकी एक असलेल्या NEET परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाने शिक्षण व्यवस्थेतील सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. वर्षानुवर्षे गुप्त राहणाऱ्या बेकायदेशीर मटक्याच्या आकड्यांपेक्षा सरकारी परीक्षा अधिक असुरक्षित का ठरत आहेत, याचा सखोल आढावा.

पुणे|ज्ञानप्रवाह न्यूज – देशात दरवर्षी लाखो विद्यार्थी डॉक्टर होण्याचे स्वप्न घेऊन NEET परीक्षा देतात.विद्यार्थ्यांचे भविष्य,पालकांची अपेक्षा आणि संपूर्ण शिक्षण व्यवस्थेची विश्वासार्हता या एका परीक्षेवर अवलंबून असते. मात्र गेल्या काही वर्षांत NEET पेपरफुटीच्या घटनांनी देशभर संतापाची लाट निर्माण केली आहे.

विशेष म्हणजे, समाजात अनेक दशकांपासून बेकायदेशीर समजला जाणारा मटक्याचा आकडा अत्यंत गुप्त पद्धतीने चालतो आणि त्याची माहितीही सहज बाहेर येत नाही. मग अत्याधुनिक तंत्रज्ञान, सीसीटीव्ही, डिजिटल सुरक्षा, बायोमेट्रिक पडताळणी आणि सरकारी यंत्रणा असतानाही NEET सारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेचे प्रश्नपत्रिका बाहेर कशी येते हा सर्वसामान्यांच्या मनातील मोठा प्रश्न आहे.

शिक्षण व्यवस्था की पेपर माफिया ?

पेपरफुटीच्या प्रत्येक घटनेनंतर तपास,अटक,चौकशी आणि आश्वासनांची मालिका सुरू होते. पण प्रत्यक्षात विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत होत चालला आहे.अनेक वेळा परीक्षा केंद्रांपासून कोचिंग नेटवर्कपर्यंत साखळी तयार झाल्याचे तपासातून समोर येते.आता असे झाले आहे की पैसे देऊन काहीही विकत घेऊ शकतो अशी धारणा पक्की झाली आहे.

आज शिक्षण क्षेत्रात स्पर्धा प्रचंड वाढली आहे.मेडिकल प्रवेशासाठी लाखो विद्यार्थी काही हजार जागांसाठी स्पर्धा करतात.या तणावपूर्ण वातावरणाचा फायदा काही गैरप्रवृत्ती घेत असल्याचे आरोप वारंवार होत आहेत.

विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी

ग्रामीण भागातील विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करून परीक्षा देतात. अनेक कुटुंबे कर्ज काढून मुलांना कोचिंगसाठी पाठवतात. पण पेपरफुटीमुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांचे नुकसान होते. त्यांच्या मेहनतीपेक्षा पैशाला व गैरमार्गाला महत्त्व मिळत असल्याची भावना निर्माण होते.

तंत्रज्ञान असूनही अपयश का ?

डिजिटल युगात प्रश्नपत्रिका एन्क्रिप्टेड स्वरूपात पाठवल्या जातात, सुरक्षा यंत्रणा कार्यरत असतात तरीही मानवी हस्तक्षेप, भ्रष्टाचार व आतील संगनमतामुळे गळती होत असल्याची शक्यता व्यक्त केली जाते म्हणजेच जर कुंपनच शेत खात असेल तर काय करायचे ?

कठोर कायद्याची गरज

पेपरफुटी ही केवळ परीक्षा गैरव्यवहार नसून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ आहे. त्यामुळे अशा गुन्ह्यांमध्ये जलदगती न्यायालय, कठोर शिक्षा आणि कायमस्वरूपी बंदी यांसारख्या उपाययोजनांची मागणी वाढत आहे.

समाजाला विचार करण्याची वेळ

एका बाजूला बेकायदेशीर जुगार व्यवस्थेतही गुप्तता टिकते, तर दुसऱ्या बाजूला देशाच्या शिक्षण व्यवस्थेतील गोपनीयता वारंवार भंग होते.ही केवळ सुरक्षा यंत्रणेची चूक नाही तर संपूर्ण व्यवस्थेच्या नैतिकतेवर उभे राहिलेले प्रश्नचिन्ह आहे.

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित परीक्षांमध्ये पारदर्शकता, विश्वास आणि कठोर अंमलबजावणी निर्माण करणे ही काळाची गरज बनली आहे.

Leave a Reply

Back To Top