आईत्वाचं महात्म्य अवकाशापेक्षाही विशाल : डॉ.मारुती टकले यांचे प्रतिपादन
वात्सल्यस्नेहाची अमृतधार आई… काव्यसंग्रहाचे पंढरपुरात प्रकाशन; कविसंमेलनाने रसिक मंत्रमुग्ध
पंढरपूर येथे वात्सल्यस्नेहाची अमृतधार आई…या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन उत्साहात पार पडले. डॉ.मारुती टकले यांनी आईच्या वात्सल्याचे महत्त्व अधोरेखित करताना आईत्वाचं महात्म्य अवकाशापेक्षाही विशाल असल्याचे सांगितले.महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा येथील कवी- कवयित्रींच्या कवितांनी सजलेल्या या कार्यक्रमात कविसंमेलनाने साहित्य रसिकांना मंत्रमुग्ध केले.
पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज – आईचे वात्सल्य,स्नेह आणि आईत्वाचं महात्म्य यांची व्याप्ती ही अवकाशा पेक्षाही विशाल आहे,असे मत डॉ.मारुती नवसाबाई रामा टकले यांनी पंढरपूर येथे आयोजित वात्सल्यस्नेहाची अमृतधार आई… या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना व्यक्त केले.
मार्मिक संवादच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या साहित्यिक कार्यक्रमात महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यांतील कवी व कवयित्रींच्या आईविषयक निवडक कवितांचा समावेश असलेल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी बोलताना डॉ.टकले यांनी सांगितले की,जगभरातील अनेक कवी-कवयित्रींनी आपल्या लेखणीतून आईची महती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आईचे प्रेम, त्याग आणि ममता यांचे वर्णन शब्दांत करणे अशक्य असून तिचा महिमा खरोखरच अगाध आहे.
या प्रकाशन सोहळ्यास व्यासपीठावर विजयकुमार कस्तुरे, नागेश सिंघन,शोभाताई माळवे, रत्नप्रभाताई पाटील तसेच काव्यसंग्रहाचे संपादक आणि विश्वविक्रमवीर कवी रवि वसंत सोनार आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमानिमित्त आयोजित कविसंमेलनात विविध कवींनी आईवरील आशयघन आणि भावपूर्ण कविता सादर करून उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. यामध्ये सचिन कुलकर्णी, डॉ. बबनराव महामुने, शुभांगीताई दहिवाळ,शिवाजीराव बागल, सुप्रियाताई हिल्लाळ, शिवाजीराव वाघमारे, शैलजाताई सासवडे, जैनुद्दीन मुलानी, अंकुश पडघान, संतोष रायबान, दादासाहेब खरात, सुरेखाताई कुलकर्णी,रामलिंग हागवणे यांच्यासह अनेक मान्यवर कवी-कवयित्रींचा सहभाग होता.
जागतिक मातृत्व दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रकाशित झालेल्या या काव्यसंग्रहामुळे पंढरपूर शहर व तालुक्यात साहित्यिक वातावरण निर्माण झाले असून प्रकाशक, संपादक आणि सहभागी कवी-कवयित्रींचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. विविध सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर अशाच प्रकारची कविसंमेलने आयोजित व्हावीत, अशी अपेक्षाही साहित्य रसिकांनी व्यक्त केली.






