1. महायुतीत जागावाटप निश्चित; भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर लढणार
2. सोलापुरात परिचारकांना डावलून राजेंद्र राऊतांना उमेदवारी; भाजपच्या यादीने राजकीय चर्चांना उधाण
3. रेवती सुळे यांच्या होणाऱ्या सासऱ्यांना भाजपचे तिकीट; विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर
भाजपची विधान परिषदेसाठी 11 उमेदवारांची घोषणा; प्राजक्त तनपुरे, अरुण लखानींसह राजेंद्र राऊतांना संधी
मुंबई | ज्ञानप्रवाह न्यूज: भारतीय जनता पक्षाने आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी आपल्या 11 उमेदवारांची अधिकृत घोषणा केली आहे.भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने या नावांना मंजुरी दिली असून पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांच्या स्वाक्षरीने अधिकृत यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.या यादीत विदर्भ, मराठवाडा,खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून कार्यरत असलेल्या नेत्यांना संधी देण्यात आली आहे.
भाजपने अमरावतीमधून प्रवीण पोटे, सोलापूरमधून राजेंद्र राऊत, सांगली-सातारा मतदारसंघातून धैर्यशील कदम, अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे, संभाजीनगर- जालना मतदारसंघातून सुहास शिरसाट,नांदेडमधून अमर राजूरकर, धाराशिव-बीड-लातूरमधून बसवराज पाटील,जळगावमधून नंदकिशोर महाजन,नागपूरमधून राजीव पोतदार यांच्यासह इतर उमेदवारांना संधी दिली आहे.
या यादीतील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेले नाव म्हणजे वर्धा- चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघातून उमेदवारी मिळालेले अरुण लखानी. ते खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांचे होणारे सासरे असल्याने त्यांच्या उमेदवारीची राज्यभर चर्चा सुरू झाली आहे.

महायुतीत जागावाटपाचा तिढा अखेर सुटला
विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीत जागावाटपावरून काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. अखेर भाजप 11 जागा, शिवसेना 4 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित झाले आहे. शिवसेना सात जागांसाठी आग्रही होती, तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ एक जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र अंतिम वाटपात राष्ट्रवादीला दोन जागा मिळाल्याने राजकीय समीकरणांमध्ये बदल झाल्याचे दिसून आले.

सोलापुरातून प्रशांत परिचारकांना डावलल्याची चर्चा
सोलापूर मतदारसंघात भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांना उमेदवारी मिळेल अशी पक्ष कार्यकर्त्यांची आणि समर्थकांची अपेक्षा होती.विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाच्या आदेशानुसार त्यांनी दोन वेळा माघार घेतल्याचे सांगितले जात होते. पक्षनिष्ठा, संघटनात्मक काम आणि दीर्घकालीन योगदान लक्षात घेता त्यांना तिकीट मिळेल, असे जवळपास निश्चित मानले जात होते.
मात्र भाजपने बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना उमेदवारी दिल्याने परिचारक समर्थकांमध्ये नाराजीची भावना व्यक्त होत आहे. यामुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली असून आगामी काळात त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

