पंढरपूर शहरात अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांची धडक कारवाई; २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

पंढरपूर शहरात अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांची धडक कारवाई; २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

पंढरपूर, दि. २९ मे २०२६ : पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारू विक्री विरोधात करण्यात आलेल्या विशेष कारवाईत पोलिसांनी दोन ठिकाणी छापे टाकून २७ हजार २० रुपयांचा देशी-विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, अवैध व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक (भा.पो.से.) प्रशांत डगळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पंढरपूर शहरातील इसबावी परिसरात काही व्यक्ती अवैधपणे देशी-विदेशी दारूची विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी स्वतःच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकासह कारवाई केली.

शिंदे चौक परिसरातून १० हजारांचा दारूसाठा जप्त

पहिल्या कारवाईत इसबावी येथील शिंदे चौक परिसरात राहणाऱ्या दिवाबाई ज्ञानेश्वर काळे या त्यांच्या घराशेजारी निळ्या रंगाच्या प्लास्टिक बॅरलमध्ये हातभट्टी दारू विक्री करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी छापा टाकून त्यांच्या ताब्यातून सुमारे १० हजार रुपये किमतीची हातभट्टी दारू जप्त केली.

सह्याद्री नगरात दुसरी कारवाई

यानंतर पोलिसांनी सह्याद्री नगर, इसबावी येथे दुसरी कारवाई केली. येथे पथ्याच्या खालच्या ओढ्याजवळ काही व्यक्ती देशी-विदेशी दारूच्या बाटल्या विक्री करत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी शोभा गणेश देशमुख यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून १७ हजार २० रुपये किमतीचा देशी-विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला.

चौकशीदरम्यान संबंधित दारूची खरेदी-विक्री त्यांचे पती गणेश सुनील देशमुख करीत असल्याची माहिती समोर आली.

तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया

या दोन्ही कारवायांमध्ये एकूण २७ हजार २० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दिवाबाई ज्ञानेश्वर काळे, शोभा गणेश देशमुख आणि गणेश सुनील देशमुख यांच्याविरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

नागरिकांना पोलिसांचे आवाहन

सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या परिसरात अवैध दारू विक्री, मटका, जुगार किंवा इतर कोणतेही बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. अशा समाजविघातक कृत्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल.

ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ.हेडवे, मपोहेकॉ.राऊत,पोना.शिंदे, पोना. चव्हाण, पोकॉ. माने, पोकॉ. घायाळ,पोकॉ.राहुल लोंढे आणि पोकॉ.हुलजंती यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

Leave a Reply

Back To Top