मंगळवेढा पोलिसांचे मोठे यश! बेपत्ता झालेल्या ६ अल्पवयीन मुलींचा शोध; दोन जणांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

महिला फौजदार डॉ. आरती कणेरे यांची उल्लेखनीय कामगिरी; ६ बेपत्ता मुली सुरक्षित परत

मोबाईल लोकेशन व सीडीआरच्या मदतीने ६ मुलींचा शोध; मंगळवेढा पोलिसांची प्रभावी कारवाई

बेपत्ता मुलींच्या शोधात मंगळवेढा पोलिसांना यश; दोन आरोपींना पोक्सोचा फास

मंगळवेढा | ज्ञानप्रवाह न्यूज : मंगळवेढा शहर व ग्रामीण भागातील विविध ठिकाणांहून बेपत्ता झालेल्या सहा अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात मंगळवेढा पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.महिला पोलीस उपनिरीक्षक डॉ.आरती कणेरे यांच्या अथक प्रयत्नांमुळे या मुली सुरक्षितरित्या शोधण्यात आल्या असून त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उचेठाण, चोखामेळानगर, नागणेवाडी, साठेनगर आणि नंदूर परिसरातून काही महिन्यांपूर्वी सहा अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या होत्या.या प्रकरणांचा तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक डॉ.आरती कणेरे यांनी हाती घेतला.

तपासादरम्यान मुलींच्या मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे शोधमोहीम राबविण्यात आली.या प्रयत्नांतून सर्व सहा मुली विविध ठिकाणांहून सुरक्षितरित्या शोधण्यात पोलिसांना यश आले.

या तपासादरम्यान पांडुरंग सुनिल माने आणि चांद शेख या दोन व्यक्तींविरुद्ध पोक्सो (POCSO) कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

विशेष म्हणजे डॉ.आरती कणेरे यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारल्यापासून आतापर्यंत तब्बल ३१ बेपत्ता मुलींचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे. त्यांच्या या कार्याचे नागरिकांकडून आणि पोलीस विभागाकडून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Back To Top