गणेशखिंड रस्त्यावरील ५२९ झाडांची वृक्षतोड थांबवा; डॉ. नीलम गोऱ्हे यांची मनपा आयुक्तांकडे मागणी
७,००० हरकतींना न्याय द्या,झाडे वाचवा! गणेशखिंड वृक्षतोडी विरोधात डॉ.नीलम गोऱ्हे आक्रमक
विकास आणि पर्यावरणाचा समतोल राखा; ५२९ झाडांच्या तोडीला स्थगिती देण्याची डॉ. गोऱ्हे यांची मागणी
Pune news: पुणे | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.५ जून २०२६ :गणेशखिंड रस्त्याच्या रिझर्व्ह बँक इन्स्टिट्यूट ते संचेती चौक या मार्गावरील ४५ मीटर रुंदीकरण प्रकल्पासाठी प्रस्तावित असलेल्या ५२९ ऐतिहासिक आणि जुन्या वृक्षांच्या तोडीविरोधात आता जनआंदोलनाचे स्वरूप निर्माण झाले आहे.या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या मा.उपसभापती आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांनी थेट हस्तक्षेप करत पुणे महानगरपालिका आयुक्तांना पत्र पाठवून वृक्षतोडीचा प्रस्ताव तातडीने स्थगित करण्याची मागणी केली आहे.

मनपा प्रशासनाने १ मार्च २०२६ रोजी वृक्षतोडीचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणासमोर मांडला होता. त्यानंतर २ एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या सार्वजनिक नोटीसीनुसार नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या होत्या.या आवाहनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत तब्बल ७,००० हरकती नोंदविण्यात आल्या. पर्यावरणप्रेमी, नागरिक संघटना आणि विविध सामाजिक संस्थांनी या वृक्षतोडीला तीव्र विरोध दर्शविला आहे.
डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आपल्या पत्रात महाराष्ट्र नागरी क्षेत्र वृक्ष संवर्धन नियमांचा उल्लेख करत एवढ्या मोठ्या प्रमाणात प्राप्त झालेल्या हरकतींवर नागरिकांना प्रत्यक्ष सुनावणीची संधी देणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे.त्यांनी प्रशासनाला स्मरण करून दिले की,पर्यावरणीय परिणामांचा विचार न करता घेतलेले निर्णय भविष्यात शहरासाठी घातक ठरू शकतात.
त्यांनी असेही म्हटले आहे की, मेट्रो लाईन-३ च्या खांबांमुळे काही भागात रस्त्याची उपलब्ध रुंदी आधीच कमी झाली आहे. त्यामुळे केवळ झाडे तोडून वाहतूक कोंडी पूर्णपणे सुटेल असा दावा वास्तववादी नाही.याउलट परिसर संस्था आणि इतर पर्यावरण तज्ज्ञांनी सुचविलेल्या पर्यायी डिझाईनचा विचार केल्यास, विद्यमान जागेतच सायकल ट्रॅक, पादचारी मार्ग आणि वाहतुकीचे उत्तम नियोजन करता येऊ शकते. विशेष म्हणजे या पर्यायामुळे एकही झाड तोडण्याची आवश्यकता भासणार नाही.
या विषयावर सर्व संबंधित घटकांमध्ये समन्वय साधण्यासाठी डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पुढील आठ दिवसांत पुणे महानगरपालिकेचे नगर अभियंता, वाहतूक पोलीस विभाग, ‘परिसर’ संस्था आणि मॉडेल कॉलनी पर्यावरण समितीच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक आयोजित करण्याची सूचना केली आहे. या बैठकीत पर्यावरणपूरक पर्यायी आराखड्यांची प्रत्यक्ष पाहणी करून सर्वसमावेशक निर्णय घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

पुणेकरांचा विकासकामांना विरोध नसून पर्यावरणाचा समतोल राखत, जनभावनांचा आदर करून आणि शाश्वत विकासाला प्राधान्य देत प्रशासनाने निर्णय घ्यावा, असे आवाहन डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले आहे. गणेशखिंड रस्त्यावरील वृक्षतोडीचा प्रश्न आता केवळ वाहतूक व्यवस्थेपुरता मर्यादित न राहता शहराच्या पर्यावरणीय भवितव्याशी जोडला गेला असून, पुढील निर्णयाकडे संपूर्ण पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

