जेजुरीच्या विकासासाठी सेंद्रिय हळद, भक्तनिवास व कॉरिडॉरची गरज : डॉ.नीलम गोऱ्हे

जेजुरीच्या विकासासाठी सेंद्रिय हळद, भक्तनिवास आणि धार्मिक पर्यटन कॉरिडॉरची गरज : डॉ. नीलम गोऱ्हे

भाविकांना मोफत सेंद्रिय हळद देण्याचा विचार व्हावा; जेजुरी विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध – डॉ.नीलम गोऱ्हे

जेजुरी|ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३ जून : जेजुरी देवस्थानच्या विकासासाठी सेंद्रिय हळदीचा वापर, आधुनिक भक्तनिवास उभारणी आणि वाराणसीच्या धर्तीवर धार्मिक पर्यटनाला चालना देणारा कॉरिडॉर उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेत्या व आमदार डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले.

आज जेजुरी येथे श्री खंडोबाचे विधिवत दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विविध विकासात्मक मुद्द्यांवर भाष्य केले. श्रद्धेला धक्का न लावता सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केले असून, जेजुरीत पूर्वी अस्तित्वात असलेली मुरळी प्रथा बंद करण्यात मोठे यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

धर्म आणि परंपरा यांचा आदर राखत समाजसुधारणा करता येते, असे सांगत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी समाजातील सर्व घटकांच्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले. जेजुरीतील भंडाऱ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हळदीबाबत चिंता व्यक्त करत त्यांनी देवस्थानने भाविकांना मोफत सेंद्रिय हळद उपलब्ध करून देण्याचा विचार करावा, अशी सूचना केली. राज्य सरकारच्या सेंद्रिय हळद संशोधन केंद्राच्या माध्यमातून शुद्ध आणि दर्जेदार हळद उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करता येतील, असेही त्या म्हणाल्या.

रासायनिक आणि बनावट हळदी मुळे भाविकांच्या त्वचा व डोळ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून मंदिराच्या ऐतिहासिक दगडी वास्तूलाही नुकसान पोहोचत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे सेंद्रिय व शुद्ध हळदीचा वापर वाढविणे काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी श्री मार्तंड देवसंस्थानला वैयक्तिकरित्या २१ हजार रुपयांची देणगी धनादेशाद्वारे प्रदान केली.

देवस्थानच्या जमिनींच्या प्रश्नावर बोलताना डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, हा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून त्यावर सकारात्मक पावले उचलली जात आहेत. जेजुरीला दरवर्षी लाखो भाविक भेट देत असल्याने आधुनिक सुविधा असलेले भक्तनिवास उभारणे अत्यावश्यक आहे. यासाठी स्थानिक नागरिक, देवस्थान प्रशासन आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी एकत्रितपणे पुढाकार घ्यावा.

वाराणसीच्या धर्तीवर जेजुरीमध्ये धार्मिक पर्यटन कॉरिडॉर उभारल्यास पर्यटनाला मोठी चालना मिळू शकते. मात्र अशा विकासकामांमध्ये स्थानिक नागरिकांचा सहभाग, विश्वास आणि सहकार्य हे सर्वात महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी देवस्थानचे विश्वस्त ॲड.विश्वास पानसे यांनी डॉ.नीलम गोऱ्हे यांचा शाल,श्रीफळ व श्री खंडोबाची प्रतिमा देऊन सत्कार केला.तसेच कोविड काळात घडशी समाजाला दिलेल्या मदतीबद्दल घडशी समाजाच्यावतीनेही त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Back To Top