तांदूळवाडी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना ४० लाखांची मदत; आमदार समाधान आवताडे यांच्या पाठपुराव्याला यश
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी ५ लाखांचा दिलासा; तांदूळवाडी दुर्घटनेतील ८ कुटुंबांना आर्थिक आधार
पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१९ जून २०२६ – माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी परिसरात पंढरपूर- सातारा मार्गावर काही दिवसांपूर्वी घडलेल्या भीषण अपघातात पिकअप वाहन विहिरीत कोसळून पंढरपूर तालुक्यातील एकाच कुटुंबातील आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण पंढरपूर तालुक्यावर शोककळा पसरली होती.
दुर्घटनेनंतर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांनी तातडीने मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले होते.तसेच शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासनही दिले होते.त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अपघातग्रस्त कुटुंबीयांसाठी एकूण ४० लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे.
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या इंदुबाई दशरथ बावचे,पूजा अमोल सातूरे,पूजा बालाजी बावचे,अश्विनी संदीप बावचे,संस्कार संदीप बावचे, संस्कृती संदीप बावचे,भारत अमोल सातूरे आणि समर्थ बालाजी बावचे यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपये याप्रमाणे एकूण ४० लाख रुपयांची आर्थिक मदत आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली.

यावेळी युवक नेते प्रणव परिचारक, द्रोणाचार्य हाके, नगरसेवक राहुल शिंदे-नाईक,रोहित पानकर,तमीम मुजावर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मंजूर झालेली ही मदत सोलापूर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून प्राप्त झाली असून संबंधित कुटुंबीयांना धनादेशाचे वितरण करण्यात आले.
याबाबत आमदार समाधान आवताडे यांनी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करून मदत तातडीने मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांच्या या प्रयत्नांमुळे अवघ्या काही दिवसांतच अपघातग्रस्त कुटुंबीयांना आर्थिक दिलासा मिळाला आहे.
शासनाकडून मिळालेली ही मदत दुःखाची भरपाई करू शकत नसली तरी संकटग्रस्त कुटुंबीयांना कठीण काळात आधार देणारी ठरणार असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

