पंढरपुरात माणुसकीचा झरा राहुल धोत्रे यांनी गरीब चिमुकल्यांना दिले नव्या गणवेशांचे स्वप्न
स्वतःची परिस्थिती बेताची,पण समाजसेवेची श्रीमंती मोठी; राहुल धोत्रे यांच्या उपक्रमाने जिंकली मने
Pandhapur news : पंढरपूर |ज्ञानप्रवाह न्यूज : जून महिना सुरू होताच शाळांची घंटा पुन्हा एकदा वाजू लागली आहे.नव्या शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी विद्यार्थी उत्साहाने सज्ज झाले असताना अनेक गरीब कुटुंबांतील मुलांसमोर मात्र गणवेश आणि शैक्षणिक साहित्याचा प्रश्न उभा राहतो. अशाच वेळी पंढरपूरातील एका तरुणाने समाजापुढे माणुसकीचा आदर्श ठेवत गरजू चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला.

हॉटेल वीरंगुळा परिसरातील अंगणवाडीत शिकणाऱ्या गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना राहुल धोत्रे यांनी स्वतःच्या खिशातून हजारो रुपये खर्च करून नवीन गणवेशांचे वाटप केले. आर्थिक परिस्थिती अत्यंत साधी असतानाही आपल्या वस्तीतील एकही मूल शिक्षणा पासून वंचित राहू नये, या भावनेतून त्यांनी हा स्तुत्य उपक्रम राबविला.

या कार्यक्रमाला मनसे नेते दिलीप धोत्रे तसेच समाजसेवक अरुण कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेशांचे वितरण करण्यात आले. नवीन गणवेश मिळाल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि समाधान पाहून उपस्थितांचे डोळेही पाणावले.

समाजातील गरजू घटकांसाठी पुढाकार घेण्याची गरज असताना राहुल धोत्रे यांनी केलेली ही मदत अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शिक्षणाच्या प्रवासात आर्थिक अडचणी अडथळा ठरू नयेत, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
स्थानिक नागरिकांनी राहुल धोत्रे यांच्या या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत भविष्यातही अशा उपक्रमांना समाजाने साथ देण्याचे आवाहन केले आहे. पंढरपूरात माणुसकीचा झरा अजूनही वाहत असल्याची प्रचिती या उपक्रमातून पुन्हा एकदा आली.

